लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : गेल्या वर्षी भारतात झालेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्यांचे तिकीटे देण्याचे आमिष दाखवून मरीन ड्राईव्ह येथील व्यापाऱ्याची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बंगळुरूमध्ये राहणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
तक्रारदार हर्ष भार्गव (३८) मरीन ड्राईव्ह परिसरात राहतात. त्यांच्या तक्रारीवरून बंगळुरू येथे राहणाऱ्या प्रीती एस. ए. पद्मनाभन व एका अनोळखी व्यक्तीविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी भादंवि कलम ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारनुसार, २०२३ मधील क्रिकेट विश्वचषक सामन्यांची तिकीटे आहे त्या किमतीत देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातीला तक्रारदाराला काही तिकीटेही देण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने २४ लाख २७ हजार रुपये त्यांची बहिण व वडिलांच्या बँक खात्यातून आरोपी महिलेला पाठवले.
आणखी वाचा-तोतया अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले, खार पोलिसांकडून पाच जणांना अटक
तक्रारदाराने २० ऑक्टोबर, २०२३ ते १२ नोव्हेंबर, २०२३ या कालावधील ही रक्कम हस्तांतरित केली. त्यानंतर तक्रारदाराला तिकिटे मिळाली नाहीत. त्यामुळे तक्रारदाने पैशांची मागणी केली असता त्यांना केवळ पाच लाख ४५ हजार रुपये परत करण्यात आले. उर्वरीत १८ लाख ८२ हजार रुपये तक्रारदाराला परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने संबंधित महिला व तिच्या सहकाऱ्यांविरोधात नुकतीच मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.