scorecardresearch

सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक; तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी करून ९७ मुलांच्या तपासणीसाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली होती.

crime 22
सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक (प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता )

सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली एका डॉक्टर महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला. लष्करातील अधिकारी असल्याची बतावणी करणारे तोतया चंद्रप्रकाश आणि सत्यप्रकाशविरुद्ध वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा- मुंबई : होळीनिमित्त कोकणात एसटीच्या २५० जादा बस सोडणार

तक्रारदार महिला डॉक्टर असून सांताक्रुज येथे त्यांचा खाजगी दवाखाना आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रप्रकाश नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आपण सीआयएसएफमध्ये कामाला असल्याचे त्याने महिला डॉक्टरला सांगितले. त्यांच्या दवाखान्यात सैन्यातील ९७ मुलांची वैद्यकीय तपासणी करायची आहे. दररोज दहा मुलांना तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्यासाठी त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी दूरध्वनी करतील, असे चंद्रप्रकाशने सांगितले. त्यानंतर त्यांना सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी करून ९७ मुलांच्या तपासणीसाठी ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली होती. डॉक्टर महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने त्यांना व्हीडीओ कॉल करून लष्करी अधिकारी असल्याचे भासविले होते.

हेही वाचा- मुंबई विमानतळावर दहशतवादी कारवायांचा इशारा ; सहार पोलिसांकडून गुन्हा दाखल

तोतया अधिकाऱ्यांनी डॉक्टर महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यातून सुमारे दोन लाख रुपये ऑनलाईन हस्तांतरीत केले. खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त होताच डॉक्टर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सत्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश नाव सांगणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:05 IST