लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: कुरिअरने पाठवलेल्या पाकिटात अमली पदार्थ असल्याचे सांगून काही भामट्यांनी मुलुंडमधील एका शिक्षिकेची सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत शिक्षिकेने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.




भांडुपमधील नामांकित शाळेत शिक्षिका असलेल्या तक्रारदार महिलेला चार दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाचा फोन आला. आपण कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्याने शिक्षिकेला तुम्ही पाठवलेल्या कुरिअरच्या पाकिटात अमली पदार्थ आहेत, असे सांगितले.
आणखी वाचा-मुंबई:क्षयरोगाची औषधे डिसेंबरपर्यंत मिळणे अवघड; क्षयराग समन्वयक, संस्थाचा आरोप
मात्र शिक्षिकेने कुठलेही कुरिअर पाठवले नसल्याने तत्काळ चुकीचा नंबर असल्याचे सांगून फोन बंद केला. मात्र त्यानंतर दुसऱ्या इसमाने फोन करून आपण गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे कुरिअरबाबत विचारणा केली. तीन ते चार जणांनी विविध अधिकारी असल्याचे भासवून शिक्षिकेला अटकेची भीती दाखवली. त्यानंतर आरोपींनी शिक्षिकेच्या बँक खात्यांची माहिती घेऊन तिच्याकडून तब्बल सव्वाचार लाख रुपये घेतले. पुढे देखील आरोपींनी विविध कारणे सांगून तिच्याकडे पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यानंतर शिक्षिकेला याबाबत संशय आला. तिने तत्काळ नवघर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून, तपास सुरू केला आहे.