लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका संस्था चालकासह दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अशा प्रकारे उत्तर प्रदेश, दिल्ली, नवी मुंबई येथेही फसवणूक केल्याचा संशय आहे.

सौरभ कृष्णबिहारी उपाध्याय (४२) व सपन श्रीराजकुमार तनेजा (४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलीने वैदयकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट ही प्रवेश परीक्षा २०२४ मध्ये दिली होती. २६ ऑगस्टला तक्रारदार अटक आरोपीत सौरभ उपाध्याय चालवत असलेल्या नवी दिल्लीतील एज्युपिडिया एज्युकेशन सेंटर येथे गेले होते. तेथे दुसरा अटक आरोपीत सपन तनेजा याने अर्ज भरून रक्कम सात हजार ७०० रुपये स्वतः च्या बँक खात्यामध्ये स्विकारले. तक्रारदार यांच्या मुलीला ग्रान्ट शासकीय वैदयकीय महाविदयालय, भायखळा, मुंबई येथे एम.बी.बी.एस. च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमीष आरोपींनी दाखवले होते. त्यासाठी ४५ लाख रुपयांची खर्च येईल, असे सांगितले. तसेच दोन लाख रुपये तक्रारदार यांच्याकडून बँक व्यवहाराद्वारे स्वीकारले.

आणखी वाचा-दहिसर येथे मोटरगाडीच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

तनेजा याच्या सांगण्यावरून तक्रारदार त्यांच्या मुलीसह १२ सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास ग्रान्ट शासकीय वैदयकीय महाविदयालय, भायखळा, मुंबई येथे गेले. तेथे तक्रारदार यांना सपन तनेजा, सौरभ उपाध्याय आणि एक व्यक्ती भेटले. त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलीला मुख्य ओपीडी, सर जे.जे. समूह रूग्णालये, भायखळा, मुंबई येथील एका डॉक्टरच्या खोलीत नेऊन तिची मुलाखत घेण्याचे नाटक केले आणि मुलीची कागदपत्रे तसेच रक्ताचा नमुना घेतला. तक्रारदार यांना संशय आल्यावरून त्यांनी याबाबत कफ परेड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी रूपेश भागवत यांना माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त(परिमंडळ-१) डॉ. प्रविण मुंडे, पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आरोपींना गेट वे ऑफ इंडिया परिसरामधून ताब्यात घेतले. ही फसवणूक सर जे.जे. मार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे तेथे याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

आणखी वाचा-मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण

आरोपी सराईत असून उपाध्याय याच्याविरोधात उत्तर प्रदेश राज्यामतील लखनौ येथे दोन, कानपूर येथे एक, पिलीभित एक, लखीमपुर येथे एक तसेच दिल्लीतील व्दारका नॉर्थ पोलीस ठाण्यात एक आणि नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यात एक गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच तनेजा याच्याविरूध्द लखीमपुर उत्तर प्रदेश याठिकाणी अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली असून त्याची पडताळणी सुरू आहे.