मुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ७६४ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात सुमारे ८१ कोटी ८८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. ही कारवाई मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २०२० अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली. या प्रकरणात विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता, अजय आर. राजेंद्रप्रसाद गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ७६४ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या गुन्ह्यावरून ईडीकडून तपासकेंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपी विजय गुप्ता आणि अजय गुप्ता यांनी बँकेचे अधिकारी, सनदी लेखापाल (सीए), कर्ज सल्लागार आणि इतर आरोपींच्या मदतीने संगनमत करून ही फसवणूक केली. बनावट कागदपत्रांच्या साह्याने कंपनींच्या नावे विविध कर्ज व पत सुविधा घेतल्याचा आरोप आहे. या रकमेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी आणि इतर अनधिकृत कारणांसाठी करण्यात आला. त्यामुळे एसबीआयला ७६४ कोटी ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले.
५० पेक्षा अधिक बनावट कंपन्यांमार्फत फसवणूक
या गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी बनावट कंपन्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. फसवणुकीची रक्कम ५० हून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहारात आणण्यात आली. त्यानंतर त्यातील ४२ कोटी रुपये रोख स्वरूपात काढण्यात आल्याची माहिती ईडीने दिली. या रकमेचा वापर करून आरोपींनी स्वतःच्या, कुटुंबीयांच्या आणि बेनामी व्यक्तींच्या नावे स्थावर मालमत्ता खरेदी केल्या. याबाबतची मााहिती ईडीला तपासात मिळाली. ईडीच्या तपासानुसार सिल्वासा आणि महाराष्ट्र येथे मिल्स खरेदीसाठी विविध कंपन्यांच्या नावाने टर्म लोन आणि कॅश क्रेडिट सुविधा घेण्यात आल्या होत्या. तसेच, राजपूत रिटेल लिमिटेड या कंपनीच्या नावाने मॉल बांधणी आणि व्यावसायिक इमारतीच्या खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले. कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बनावट व फुगवलेले करार दाखवण्यात आले. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे
मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत
या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता याला २६ मार्च २०२५ रोजी पीएमएलए कायदा कलम १९ अंतर्गत अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती ईडीला मिळाली आहे. त्या माहितीची पडताळणी सुरू आहे.