मुंबई : वैष्णवदेवीची प्रतिमा असलेल्या पाच रुपयांच्या नाण्यासाठी नऊ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून ७८ वर्षीय व्यक्तीची साडे आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महाराष्ट्राची कुष्ठरोग निर्मूलनाकडे वाटचाल! चार दशकात ६२.६४ वरून १.२ वर आले कुष्ठरुग्णांचे प्रमाण…

तक्रारदार माहिम येथे वयोवृद्ध बहिणीसह राहतात. त्यांना जुनी नाणी जमा करण्याचा छंद आहे. त्यांना २६ जून रोजी फेसबुकवर संजीवकुमार नावाच्या एका व्यक्तीची जाहिरात दिसली. त्यात वैष्णवदेवीचे चित्र असलेले एक पाच रुपयांचे नाणे होते. त्या नाण्यासाठी नऊ लाख रुपये मिळतील, असे जाहिरातीत सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी संजीवकुमारशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यावेळी त्याने या नाण्याच्या बदल्यात नऊ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. ते नाणे घेऊन पुन्हा विकण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने होकार दर्शवल्यानंतर काही दिवसांनी संजीवकुमार याने त्यांचे आधारकार्ड आणि छायाचित्र मागवले. त्यानंतर त्यांना वस्तू व सेवा कर नोंदणी करण्यासाठी काही रक्कम पाठविण्यास सांगितले.

हेही वाचा >>> सुधाकर शिंदे यांच्या मुदतवाढीस केंद्राचा नकार; प्रतिनियुक्तीची मुदत संपूनही राज्याच्या सेवेत, विरोधी पक्षांचा आक्षेप

ही प्रक्रिया तेवढ्यावरच थांबली नाही. आरोपीने त्यांना हस्तांतरीत करार, विक्रीकर, परतावा दाखल, नोंदणीकरणाचे प्रमाणपत्र, जीपीएस, टीडीएस, विमा अशी विविध कागदपत्रे तक्रारदाराला पाठवली. त्या सर्व कागदपत्रांसाठी तक्रारदाराला विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगितले. थोडे थोडे करून तक्रारदाराने आठ लाख ५८ हजार ४९२ रुपये विविध बँक खात्यात जमा केले. ही रक्कम पाठवूनही संजीवकुमार याने वैष्णवदेवीचे चित्र असलेले पाच रुपयांचे नाणे पाठविले नाही. नऊ लाखांचे खोटे आश्‍वासन देऊन त्याने त्यांना साडेआठ लाख रुपये विविध बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. हा प्रकार लक्षात येताच  वयोवृद्धाने घडलेला प्रकार माहीम पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराने जमा केलेल्या रकमेचा तपशील पोलिसांना दिला असून त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraudster cheated elderly over rs 8 lakh by offering coin with goddess lakshmi image mumbai print news zws
Show comments