मुंबई : पालिका शाळांमधील करोना प्रतिबंधक लसीकरणानंतर आता खासगी शाळांमध्येही मोफत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनबरोबर चर्चा सुरू आहे. या मोहिमेसाठी खासगी शाळांमध्ये शिबिरे घेण्याचा पालिकेचा विचार आहे. लहान मुलांचे करोनाच्या चौथ्या लाटेपासून रक्षण करण्यासाठी  लसीकरणावर जोर दिला आहे.

करोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई पालिकेने १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटासाठीचे लसीकरण सुरू केले. मात्र तीन महिन्यांनंतरही मोहिमेला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याअगोदार ३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. आता १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण वाढवण्यासाठी आरोग्य विभागकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्रांवर मुले येत नाहीत म्हणून सोसायटय़ा, बाजारपेठा अशा रहिवाशी परिसरात शिबिरे घेण्याचा प्रयत्नही आरोग्य विभागाने केले. शाळांच्या मुख्याध्यापकांशीही शिक्षण विभागाने संपर्क साधला होता. तरीही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईतील शाळा सुरू झाल्या असून १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. या वयोगटातील मुलांची संख्या ३ लाख ९५ हजारांच्या घरात असून त्यांचे लसीकरण जलदगतीने व्हावे यासाठी आता खासगी शाळांमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.