Free first class air conditioned passenger Action taken against 379 ticketless passengers special campaign Mumbai print news ysh 95 | Loksatta

फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

मध्य उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांमुळे प्रथम श्रेणीच्या तिकीट आणि पासधारक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

फुकट्यांचा प्रथम श्रेणी, वातानुकूलित प्रवाशांना ताप; विशेष मोहिमेत ३७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई: मध्य उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांमुळे प्रथम श्रेणीच्या तिकीट आणि पासधारक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच परिस्थिती वातानुकूलित लोकल प्रवाशांचीही आहे. मध्य रेल्वेतील तिकीट तपासनीसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. या मोहिमेत वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीमधील एकूण ३७९ फुकट्या प्रवाशांची तिकीट तपासनीनी धरपकड केली.

रेल्वेने ५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकिटांच्या दरात कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढू लागला आहे. प्रतिसाद वाढत असल्यामुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी घुसखोरी करू लागले आहेत. काही प्रवाशांकडे वातानुकूलित लोकलचे तिकीट नसते, तर काही प्रवासी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीचे तिकीट काढून बिनदिक्कतपणे या लोकलमधून प्रवास करीत असल्याचेही आढळले आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सध्या तिकीट तपासनीस नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन मध्य रेल्वेवरील काही प्रवासी बिनदिक्कतपणे विनातिकीट प्रवास करीत आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

मध्य रेल्वेच्या लोकलमधील प्रथम श्रेणीचे डबे  द्वितीय श्रेणीच्या डब्याच्या तुलनेत लहान आहेत. अशा वेळी विनातिकीट किंवा द्वितीय श्रेणी तिकीट आणि पासधारक प्रवासी प्रथम श्रेणीमधून सर्रास प्रवास करीत आहेत. त्यामुळे सकाळी किंवा सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रथम श्रेणी तिकीट आणि पासधारकांना आसनही उपलब्ध होत नाही.  रेल्वेने  मंगळवारी राबविलेल्या विशेष मोहिमेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७९  प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रथम श्रेणीच्या डब्यातील २५८ आणि वातानूकुलित डब्यातील १२१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 11:55 IST
Next Story
मुंबईत नोव्हेंबरमध्ये साडेआठ हजार घरांची विक्री