scorecardresearch

धारावीत सोमवारपासून विनामूल्य वर्धकमात्रा ;१८ ते ५९ वर्षे वयोगटातील पात्र नागरिकांना लस

मुंबईमध्ये हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईमध्ये हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता धारावीतील शास्त्रीनगर-२ करोना लसीकरण केंद्रावर २५ एप्रिलपासून १८ ते ५९ वर्ष वयोगटातील सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य वर्धकमात्रा देण्यात येणार आहे. जसलोक रुग्णालयाच्या पुढाकाराने सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईमध्ये १६ जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले असून पालिका आणि शासकीय रुग्णालयात १२१, खासगी रुग्णालयात १२७ अशी एकूण २४८ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत एक कोटी सात लाख २२ हजार १८४ पात्र लाभार्थ्यांनी (१०५ टक्के) पहिली, तर ९५ लाख ४४ हजार ३२८ पात्र लाभार्थ्यांनी (९३ टक्के) दुसरी मात्रा घेतली आहे.
आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि ६० वर्षांवरील आणि त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना १० जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा देण्यात येत आहे. आतापर्यंत चार लाख ८५ हजार २७७ नागरिकांना लसमात्रा देण्यात आली आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना १० एप्रिल २०२२ पासून करोना लसीची सशुल्क प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे.
काही देशांमध्ये करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटरने सामाजिक उत्तरदायिदत्वातून लसीकरण मोहिमेला हातभार लावला आहे.
धारावीमधील पालिकेच्या शास्त्रीनगर – २ नागरी आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र, एसएच-६, ट्रान्झिट कॅम्प, एम. जी. मार्गाजवळ, हुसेनिया मस्जीदच्या मागे, ९० फूट मार्ग, धारावी येथे २५ एप्रिलपासून करोना लसीची वर्धकमात्रा विनामूल्य देण्यात येणार आहे. १८ ते ५९ वयोगटातील पात्र नागरिकांना ही वर्धकमात्रा विनामूल्य देण्यात येणार आहे. मुंबईमधील खासगी रुग्णालयांनी सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून नागरिकांना विनामूल्य वर्धकमात्रा देण्याच्या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Free increments monday dharavi vaccination eligible citizens age group years amy

ताज्या बातम्या