मुंबई : मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो सफर करता येणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार १५ ऑगस्टला वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो १ मार्गिकेवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थी शाळेच्या गणवेशात असणे बंधनकारक आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने एमएमओपीएलने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान दिवसभर मोफत मेट्रो १ चा प्रवास करता येणार असल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली आहे. सकाळी साडेसहा ते रात्री १२ या वेळेत मोफत मेट्रो सेवेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. कितीही मोफत फेऱ्या करता येतील. मात्र त्यासाठी शाळेचा गणवेश बंधनकारक असेल असे एमएमओपीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्त्र्यदिनानिमित्त मेट्रो स्थानके, मेट्रो गाड्या, मेट्रो १ चा परिसर सजविण्यात येणार आहे. तसेच मेट्रो १ च्या मुख्यालयासह १२ मेट्रो स्थानकांवर ध्वजारोहण केले जाणार आहे.