scorecardresearch

धुळवड धडाक्यात; मुंबईभर रंगांची मुक्त उधळण

करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे यंदा संपूर्ण मुंबईत होळी आणि धुळवडीचा सण नागरिकांनी धूमधडाक्यात, वाजतगाजत, एकमेकांवर रंगांची उधळण करीत साजरा केला.

मुंबईत धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. जुहू चौपाटी येथे मोठी गर्दी झाली होती तर चाळी, झोपडपट्टय़ा, सोसायटय़ांमध्येही होळी मोठय़ा उत्साहात साजरी झाली. 

मुंबई : करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे यंदा संपूर्ण मुंबईत होळी आणि धुळवडीचा सण नागरिकांनी धूमधडाक्यात, वाजतगाजत, एकमेकांवर रंगांची उधळण करीत साजरा केला. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या भीतीमुळे होळी साजरी करण्यावरही र्निबध होते. यंदा मात्र र्निबध नसल्यामुळे होळी साजरी करण्याची संधी मुंबईतील सर्व चाळी, झोपडपट्टय़ा, उच्चभ्रू सोसायटय़ांनी साधली.

 फेब्रुवारी २०२० पासून जगभरात करोनाचा कहर सुरू झाला होता. जगभरात टाळेबंदीचे र्निबध हळूहळू घट्ट होत गेले. करोनाच्या सावटामुळे मार्च २०२० मध्येही होळीचा उत्सव मर्यादित प्रमाणात साजरा करण्यात आला, तर गेल्या वर्षीही धुळवडीवर र्निबध असल्यामुळे सणाला उत्साह नव्हता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे बदलून दोन वर्षांपूर्वीचा उत्साह मुंबईभर दिसून आला. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर आलेला होळी हा पहिलाच सण र्निबधमुक्त वातावरणात साजरा करण्याचा आनंद लहानथोरांना घेता आला. कोळीवाडे, चाळी, झोपडपट्टय़ा, सोसायटय़ांमध्येही होळी मोठय़ा उत्साहात साजरी झाली. करोनाचे नियम पाळून होळी साजरी करावी, असे निर्देश सरकारने दिले असले तरी नागिरकांनी मात्र मुखपट्टय़ा, करोना या सगळय़ाला बगल देत होळीचा आनंद लुटला. एकमेकांवर रंगांची उधळण करीत शुक्रवारी धुळवड साजरी करीत होते. गटागटाने होळीचा आनंद लुटत तरुणाई फिरत होती.

प्रचारालाही रंग

दोन वर्षांनी र्निबधमुक्त वातावरणात होणाऱ्या या होळीच्या सणातही अनेक ठिकाणी या वेळी प्रचाराचा, निवडणुकीचा रंगही पाहायला मिळाला. पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवकांनी होळी आणि धुळवडीत आपल्या प्रचाराचाही रंग मिसळला. अनेकांनी आपापल्या प्रस्तावित प्रभागात जाऊन होळी पेटवण्याचा मान पटकावला. तर काही जणांनी सोसायटय़ांमध्ये रंगपंचमी साजरी करत मतांची बेगमी करण्याची संधी साधली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Free scattering colors mumbai color holi holifest amy

ताज्या बातम्या