मुंबई : राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची घोषणा २५ ऑगस्टला करण्यात आली. त्यानंतर चार दिवसांतच राज्यातील १ लाख ५१ हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्टपासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला अमृत ज्येष्ठ नागरिकह्ण हे नाव दिले होते. या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

तीन दिवसांत..

योजना अंमलात आल्यानंतर २६ ते २९ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केला आहे.

हे महत्त्वाचे..

  आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.