लोकलमधून फुकटय़ांचा प्रवास सुरूच

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

मध्य रेल्वेवर आठ महिन्यांत चार लाख ६५ हजार विनातिकीट प्रवाशांची धरपकड

मुंबई : मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात रेल्वे प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांमध्ये उपनगरीय मार्गावर तब्बल चार लाख ६५ हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करण्यात आली.

करोनाकाळात लोकल प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करण्यास परवानगी होती. त्यामुळे सामान्य प्रवासी विनातिकीट किंवा बनावट ओळखपत्र बाळगून लोकलमधून प्रवास करीत होते. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ठरावीक वेळेतच सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तसेच दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींनाही ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र तरीही दोन लसमात्रा न झालेले प्रवासी आजही लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात (सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल, लोणावळा, इगतपुरीपर्यंत) सहा लाख ८३ हजार विनातिकीट प्रवाशांवर करवाई करण्यात आली. यात चार लाख ६५ हजार उपनगरीय प्रवाशी असून उर्वरित प्रवासी हे लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करीत होते. उपनगरीय प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून १७ कोटी ७३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

१०० कोटींची दंडवसुली

मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या पाचही विभागांत एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १७ लाख २२ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १०० कोटी ८२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Free travel local ysh

ताज्या बातम्या