महिन्यातभरात सेवा सुरू होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलवाहतुकीतील रो-रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शक्य तिथे ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना रो- रो सेवेद्वारे प्रवासी मालवाहतुकीबरोबरच आता मालवाहतूकही करण्यात येणार आहे. महिन्याभरात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) रो- रो टर्मिनल सेवेत दाखल होणार आहे. या टर्मिनलवरून रो- रो द्वारे नवी मुंबई ते मुंबई दरम्यान मालवाहतूक केली जाणार आहे. भविष्यात गुजरात आणि गोव्या दरम्यान रो- रो मालवाहतूक सुरू होणार आहे.

देशातील सर्वात मोठे मालवाहतूक बंदर अशी ओळख असलेली जेएनपीए अनेक प्रकल्प राबवित आहे. यातीलच एक प्रकल्प म्हणजे रो- रो सेवा. मुंबई ते मांडवा आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या रो- रो सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता रो रो द्वारे मालवाहतूक करण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार जेएनपीएने जेएनपीए ते गुजरात अशी रो- रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जेएनपीए जेट्टीवर रो- रो टर्मिनल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. अंदाजे ३७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या रो- रो टर्मिनलचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. काम पूर्ण झाल्याने आता महिन्याभरात खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करुन हे टर्मिनल सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या टर्मिनलवरून सुरुवातीला नवी मुंबई ते मुंबईदरम्यान जलमार्गे रो- रोतून मालवाहतूक करण्यात येणार आहे. पुढे गोवा आणि गुजरातदरम्यान अशी सेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या टर्मिनलवरून मालवाहतूक होणार असली तरी प्रवासी वाहतुकीचीही मुभाही यात असणार आहे. जेएनपीएवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसेल, पण  काही प्रमाणात प्रवासी वाहतुकीचीही सेवा देण्यात येईल, असेही सेठी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Freight work jnpa ro ro terminal completed service start month navi mumbai mumbai print news amy
First published on: 23-06-2022 at 13:11 IST