भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी बुधवारी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश तेली याच्यावर काल रात्री दादर स्थानकात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. येथील प्लॅटफॉर्म क्र.५ वर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या बोगीत चढत असताना हा प्रकार घडला. यावेळी दोन हल्लेखोरांनी प्रथमेशला ट्रेनमधून खाली खेचत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चालत्या ट्रेनखाली ढकलण्याचा केला प्रयत्न केला. मात्र, प्रथमेश याने आरडाओरड करताच झालेल्या गर्दीमुळे प्रथमेश बचावला. या मारहाणीत प्रथमेशचा हात जायबंदी झाला आहे. हल्ला करून पळणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी रेल्वे स्थानकातच पकडले तर दुसरा हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. प्रवीण खरात (रा.चेंबूर) असे पकडलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी दादर लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे दुसरा हल्लेखोरही लवकरच पकडण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.  राजकारणापासून अलिप्त असणाऱ्या आणि राजन तेली यांची व्यावसायिक बाजू सांभाळणाऱ्या प्रथमेशवरील हल्ल्याने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रथमेश तेली याने दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वीही नितेश राणे यांच्याकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी एकाच पक्षात असल्याने आम्ही त्याची तक्रार दाखल केली नव्हती, असे प्रथमेशने सांगितले.