मुंबई : मुंबईकर,मिरा-भाईंदरवासियांनंतर आता लवकरच ठाणेकरांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा आता काही दिवसातच संपणार आहे. वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४,४ अ मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीच्या टप्प्याचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले असून आता अंतर्गत कामे सुरु आहेत. दुसरीकडे या टप्प्याच्या संचलनाच्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेकडून तपासणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहेत.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून एप्रिलमध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार असून गायमूख ते कॅडबरी जंक्शन प्रवास केवळ १५ मिनिटात करता येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसातच मेट्रो २ ब मार्गिकेतील (अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द) मंडाले ते डायमंड गार्डनर आणि मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रो ४,४ अ मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा १०.५ किमीचा टप्पाही वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने कामास वेग दिला आहे. या टप्प्याचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. आता स्थानकांवरील अंतर्गत कामे सुरु असून १० स्थानकांपैकी ८ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. दोन स्थानकांची कामे प्रगती पथावर आहेत.
स्थानकावर सरकते जिने, उद्वाहक, सिग्नल यंत्रणा, इतर यंत्रणा स्थापित करण्याची कामे वेगात सुरु असल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. ही सर्व कामे मार्चच्या सुरुवातील पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
गायमुख ते कॅडबरी जंक्शन या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी महत्त्वाचे असे आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी यासंबंधीचा प्रस्ताव आरडीएसओ संस्थेला पाठविण्यात आला आहे. दरम्यान सध्या मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत, त्याच मार्गिकेतील यंत्रणांचा वापर मेट्रो ४,४ अ साठी करण्यात आला आहे. त्यामुळे आरडीएसओ प्रक्रियेविना थेट मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून तपासणी करुन सुरक्षा प्रमाणपत्र घेत पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा आहे. या प्रयत्न यशस्वी झाल्यास आरडीएसओ प्रक्रियेचा एक महिना वाचणार असून ३१ मार्चपर्यंत पहिला टप्पा सेवेत दाखल होईल. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. त्यामुळे ही ठाणेकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरणार आहे
इतर मार्गिकेतील गाड्यांचा वापर
मेट्रो ४,४ अ मार्गिकेसाठी गाड्या खरेदीसाठी अल्स्टाॅम कंपनीस देण्यात आलेले १८५३ कोटींचे कंत्राट २०२२ मध्ये रद्द करण्यात आले. कारशेडसाठी विलंब होत असल्याने हे कंत्राट रद्द केले गेले. त्यानंतर २०२५ मध्ये ३९ गाड्यांच्या खरेदीचे ४७८८ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार गाड्यांची बांधणी सुरु आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील गाड्या मुंबईत दाखल होण्यासाठी सप्टेंबर-आॅक्टोबर उजाडणार आहे. या गाड्यांची चाचणी करत त्या सेवेत दाखल करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे गायमुख ते कॅडबरी जंक्शन टप्प्यासाठी मेट्रो २ अ, ७, २ब मार्गिकेतील गाड्यांचा वापर करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. मेट्रो ४ ,४ अ साठीच्या गाड्या आल्यानंतर या गाड्यांचा वापर मेट्रो ४,४अ साठी केला जाणार आहे.

