मुंबई : बांगलादेशातून बेकायदेशीररित्या मुंबईत आणून कामधंदा मिळवून देणाऱ्या २६ वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आरोपी व त्याचा साथीदार २० हजार रुपयांत बांगलादेशी नागरिकांना अवैध्यरित्या मुंबईत आणून त्यांना नोकरी देत होता. तसेच भारतातून कमवलेली रक्कम बांगलादेशात अवैध्यरित्या पाठवण्याचेही काम करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
अक्रम नूर नवी शेख (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी आहे. अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. आरोपी स्वतःही बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. इथे आल्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार शफीक याच्यासह तेथील नागरिकांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरू केले.
भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश देऊन मुंबईत परिसरात कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करत होता. त्यासाठी तो प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन त्याद्वारे बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही काम करत होता. अक्रम शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. तो शिवडी येथे आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
हेही वाचा – नागपूर : पती एचआयव्हीग्रस्त असूनही थाटला संसार, समलैंगिक असल्याचे समजताच…
चौकशीत तो व त्याचे दोन मित्र वडाळा येथील बरकत अली दर्ग्यामागे भाडे तत्त्वावर राहात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झडती घेतली. आरोपींकडून दोन मोबाईल, रोख रक्कम, कोलकाता ते मुंबईचे विमान तिकीट सापडले आहे. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता तो बांगलादेशातील अनेक नागरिकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.