मुंबई : हळद म्हटले की, पिवळी, असा सार्वत्रिक समज. पण, वायनाडच्या निळ्या रंगाच्या हळदीमुळे नेमके हळदीचे प्रकार तरी किती, अशी चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात पिवळी, आंबे हळद, कस्तुरी हळद, हिरवी हळद, केरळमध्ये निळी (काळी) हळद, हिमालयात दारू हळद, ईशान्येत पिवळ्या रंगाचीच पण, बारा टक्के कर्क्यूमिनचे प्रमाण असलेल्या लकाडोंग हळद आढळून येते.

देशात फक्त पिवळ्या आणि आंबे हळदीचेच व्यावसायिक उत्पादन होते. देशभरात प्रदेशनिहाय, स्थानिक पातळीवर, जंगलात विविध प्रकारच्या हळदीच्या प्रजाती आढळून येतात. या हळदींचे व्यावसायिक उत्पादन होत नसले तरीही स्थानिक पातळीवर मसाले, औषधोपचार, आयुर्वेदिक उत्पादनांसाठी या हळदींचा उपयोग केला जातो. पण, त्यांचे उत्पादन अत्यल्प आहे.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पिवळी, कोकणात आंबे हळद, सापुतारा परिसरात हलक्या हिरव्या आणि कस्तुरी हळद सह्याद्रीच्या जंगलात आढळून येते. पांढरी हळद पूर्व हिमालय आणि कर्नाटकात प्रदेशांमध्ये आढळून येते. त्यासह हिमालयात दारू साखरा वास येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या दारू हळदीचे उत्पादन होते. केरळच्या वायनाड जंगलात हलक्या निळ्या रंगाच्या हळदीचे उत्पादन होते.

तिला काळी हळद असेही म्हटले जाते. दक्षिणेत काळी हळद शुभ मानली जाते. अनेकदा जादुटोण्यासाठीही वापर केला जातो. ईशान्य भारतातील मेघालयात पिवळ्या रंगाचीच पण, तब्बल सात ते बारा टक्के कर्क्यूमिनचे प्रमाण असलेल्या लकाडोंग हळदीची प्रजात आढळून येते. जगात आढळणाऱ्या आणि विपुल प्रमाणात आढळून येणारी ही प्रजात असून, तिचे उत्पादन फक्त मेघालयातच होते. तिची लागवड अन्य भागात केली तर कर्क्यूमिनचे प्रमाण कमी होते. ..

सह्याद्री घाट, हिमालयाच्या रांगा आणि ईशान्येत गडद पिवळा, हलका पिवळा, हलका हिरवा, हलका निळा आणि पांढऱ्या रंगाची हळद आढळून येते. फक्त भारतातच हळद पिकांत मोठे वैविध्य दिसून येते. – मनोज माळी, प्रभारी प्रमुख, हळद संशोधन केंद्र, सांगली.