मुंबई : शरद पवारांकडून काम करण्यास मोकळीक मिळत नसल्याने नाराज झालेल्या अजित पवारांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. उद्वेगातून दोनदा राजीनामा दिला होता. भाजपबरोबर जाण्याच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यावर काका शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून राष्ट्रवादीत फूट पाडली होती.

पक्षात शरद पवारांच्या सल्ल्याने काम करावे लागते ही बाब अजित पवारांना खुपत असे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना अजित पवारांनी ‘थोरांनी आता मार्गदर्शन करावे, तरुण पिढी निर्णय घेण्यात सक्षम आहे ’ असे धाडसी विधान केले होते. त्यावरून पवार काका- पुतण्यात सख्य नाही, असा संदेश गेला होता. त्यानंतरही अजित पवारांनी जाहीर समारंभात पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरून तीव्र नापसंती व्यक्त केली होती. विदर्भ, मुंबईत राष्ट्रवादीची वाढ होऊ शकली नाही याबद्दल त्यांनी नेतृत्वालाच दोष दिला होता. सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपानंतर उद्विग्न होऊन अजित पवारांनी राजीनामा देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. कोणालाही पूर्वकल्पना न देता मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली होती.

शरद पवारांना ईडीची नोटीस आल्यावर पवारांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात जाण्याचे जाहीर केले होते. पवार येणार असल्याने ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पवारांची भेट घेऊन घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. हा सारा गोंधळ सुरू असतानाच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. हा राजीनामा का दिला होता हे शेवटपर्यंत स्पष्ट झाले नाही.

बंड पुकारले राष्ट्रवादीने भाजपबरोबर जावे, असा पक्षात मतप्रवाह होता. अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी सारे नेते भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. पण शरद पवार हे भाजपबरोबर जाण्यास होकार देत नव्हते. या तिढा सुटत नसल्याने अखेर अजित पवारांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या विरोधात बंड केले. राष्ट्रवादीतील बहुसंख्य नेत्यांनी अजितदादांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपयश आले. पण विधानसभा निवडणुकीतील यशाने त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

पहाटेचा शपथविधी २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकास आघाडी आकारास आली. त्याची प्रक्रिया सुरू असताना वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. या साऱ्या घडामोडी घडत असताना पडद्यामागे वेगळेच काही घडत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत पदांवरून वादावादी झाली. तेव्हा वकिलाकडे जायचे आहे सांगून अजित पवार बैठकीबाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला हाच तो पहाटेचा शपथविधी. अर्थात अजित पवारांचा तो प्रयत्न फसला. राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मुख्य प्रवाहात आले. अजित पवारांनी माघार घेतली. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शेवटी साडेतीन दिवसांत फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. मग अजित पवार हे निमूटपणे महाविकास आघाडीत सहभागी झाले. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता, पण त्यांनी नंतर भूमिका बदलली, असा खुलासा नंतर अजित पवारांनी केला.