केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुणे येथील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ‘महाभारत’ या मालिकेतील ‘युधिष्ठीर’ अर्थात अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केली आहे. ‘भाजप’चे सदस्य असलेल्या चौहान यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून यावरून नवे महाभारत रंगले आहे. चौहान यांच्या नेमणुकीच्या निषेधार्थ येथील विद्यार्थी बेमुदत संपावर गेले आहेत.
केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निर्माते-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांची केलेली नियुक्तीही या अगोदर वादात सापडली होती.
फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही संस्था महत्त्वाची मानली जाते. नासिरुद्दीन शहा आणि अन्य अनेक दिग्गज मंडळींनी येथून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, अदुर गोपालकृष्णन, ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या नावांची चर्चा होती. मात्र या ज्येष्ठांना डावलून गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गजेंद्र चौहान हे केवळ ‘भाजप’चे सदस्य आहेत म्हणून अन्य ज्येष्ठांना डावलून त्यांची नियुक्ती झाली असल्याची चर्चा आहे.
या नियुक्तीमुळे संस्थेतील विद्यार्थी संपावर गेले असून त्यांनी भित्तिपत्रके आणि फलकांच्या माध्यमातून आपला निषेध व्यक्त केला आहे. ‘धर्मराज युधिष्ठीर’ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अभिनेत्री विद्या बालन, चित्रपट निर्माते राजू हिरानी, सिनेमोटोग्राफर संतोष स्टिव्हन यांनाही आता चौहान यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे हरिकृष्णन नचिमुथू यांनी सांगितले, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चौहान यांना पदावरून दूर केले नाही तर त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे.

मी फक्त दहा वर्षे ‘भाजप’मध्ये तर गेली ३५ वर्षे चित्रपट/दूरचित्रवाहिनी क्षेत्रात आहे. माझ्या नियुक्तीला अशा प्रकारे ‘राजकारण’ संबोधून आंधळेपणाने का विरोध केला जातो आहे, मला काही कळत नाही. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोणाची नियुक्ती केली असेल तर त्यामागे निश्चितच काहीतरी त्यांनी विचार केला असेल. अशा पदावर कोणाचीही आणि ‘भाजप’मधल्या प्रत्येकाची नेमणूक केली जात नाही. आपण लवकरच संस्थेला भेट देणार असून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत.
– गजेंद्र चौहान, अध्यक्ष फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इस्टिटय़ूट ऑफ इंडिया