scorecardresearch

‘एमयूटीपी ३ ए’साठी निधीची गरज; सात हजार कोटींसाठी ‘एमआरव्हीसी’ची लवकरच दोन खासगी बँकांशी चर्चा

मुंबई उपनगरीय रेल्वेवर ‘एमयूटीपी ३ ए’अंतर्गत ‘सीबीटीसी’ (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल) अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, १९१ वातानुकूलित लोकल, हार्बरवरील गोरेगावचा बोरिवलीपर्यंत विस्तार यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेवर ‘एमयूटीपी ३ ए’अंतर्गत ‘सीबीटीसी’ (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल) अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, १९१ वातानुकूलित लोकल, हार्बरवरील गोरेगावचा बोरिवलीपर्यंत विस्तार यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एशियन इन्फास्ट्रक्चर बँक (एआयबी) आणि न्यू डेव्हलपमेन्ट बँकेकडून निधी घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती एमआरव्हीसीतील सूत्रांनी दिली. या दोन बँकांकडून टप्प्याटप्प्याने सात हजार कोटी रुपये घेण्यात येणार आहेत.
मुंबई उपनगरीय मार्गावर प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार, तसेच खासगी बँकांकडूनही निधी घेण्यात येतो. सध्या एमआरव्हीसीला प्रकल्प राबवण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. मात्र ‘एमयूटीपी ३ ए’च्या प्रकल्पांना खीळ बसू नये यासाठी निधीची जुळवाजुळव करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्प राबवताना त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे.
‘एमयूटीपी ३ ए’मध्ये हार्बरवरील गोरेगावचा विस्तार बोरिवलीपर्यंत, बोरिवली ते विरार दरम्यान पाचवा, सहावा मार्ग, कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथा मार्ग, कल्याणपासून बदलापूपर्यंत तिसरा व चौथा मार्ग, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, वातानुकूलित लोकल यांसारख्या अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी एकूण ३३ हजार ६९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी एशियन इन्फास्ट्रक्चर बँक व न्यू डॅव्हलपमेंट बँक या दोन खासगी बँकांकडून प्रत्येकी ३,५०० कोटी रुपये घेण्यात येणार आहे. त्यासाठी बँकांसोबत लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
निधी मिळताच ‘एमयूटीपी ३ ए’मधील १९१ वातानुकूलित लोकल आणि सीबीटीसी सिग्नल यंत्रणा या प्रकल्पांना गती देण्यात येईल. सीबीटीसी यंत्रणा पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर राबवली जाणार आहे. सध्या या तीनही मार्गावर मानवी पद्धतीने सिग्नल यंत्रणा हाताळली जाते. सीबीटीसी सिग्नल यंत्रणा संपूर्णपणे डिजीटल असून यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. पुढे धावत असणाऱ्या लोकलसंदर्भातही अचूक सूचना मिळणार आहे.
निर्बंधांमुळे विलंब
खासगी बँकांकडून निधी मिळवण्यासाठी २०२० सालापासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु करोना आणि निर्बंध यामुळे बँकांसोबत बैठका आणि अन्य प्रक्रिया लांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Funding required mutp3a mrvc discuss rs 7000 crore two private banks mumbai suburban railway amy

ताज्या बातम्या