वाघांवरील ‘लोकसत्ता’च्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन
मुंबई : पशुपक्षी, व्याघ्रसंवर्धन, वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी आणि निसर्गाच्या जोपासनेसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. वाघांवरील ‘लोकसत्ता’च्या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते.
वाघांचा अधिवास, भ्रमणमार्ग, सुरक्षेसाठी असणारे कायदे अशा अनेक मुद्दय़ांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘कॉफी टेबल बुक’ची ‘लोकसत्ता’ने निर्मिती केली आहे. वाघाच्या रुबाबाला साजेशी मांडणी, तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण, लोभस छायाचित्रांनी समृद्ध अशा या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुनगंटीवर म्हणाले की, ‘‘वनसंवर्धनासाठी पैशांची कमतरता नाही. लाकडापासून कागदाची निर्मिती करून त्यातून पैसे मिळवले जातात. वाघ आणि जंगल शाप नसून, वरदान आहेत. वनाविना जीवन असूनच शकत नाही. जमीन, जल आणि जंगल याशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही’’.
‘‘देशात वाघांच्या संख्यावाढीचा वेग महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. वनसंवर्धनाचा विषय आला की, वाघावरच लक्ष का केंद्रित केले जाते, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र, अन्नसाखळी संतुलित राखण्याचे काम वाघ करतो. जगभरातील १४ देशांत वाघ असून, जगाच्या तुलनेत देशात ६५ टक्के वाघ आहेत. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. ते आता ५०० पेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात वनविभागाचे काम पाहून इतर राज्यांतील वनाधिकारी महाराष्ट्रात काम करण्यास इच्छुक आहेत. वनविभागाकडून वाघांसह हत्ती, सारस, गिधाड, चिमण्या, माळढोक यांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत’’, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, ‘‘मराठीपण आणि महाराष्ट्रपण जपणाऱ्या दोन-तीन गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे वाघ. वाघावर पुस्तक लिहिण्याबाबत अनेकांनी सुचवले. या पुस्तकाची कल्पना मुनगंटीवार यांनीही उचलून धरली. त्यातून ‘कॉफी टेबल बुक’ आकारास आले आहे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, तर सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.
विदर्भातील वाघ सह्याद्रीत पाठवणार
सह्याद्रीमधील लोकप्रतिनिधी वाघ पाठवण्याची मागणी करत असतात. तेथील परिसंस्था संतुलित राहण्यासाठी ते आवश्यक आहे. सध्या सह्याद्रीत आठ वाघ पाठवण्याचे नियोजन सुरू आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘लोकसत्ता’चा स्तुत्य उपक्रम
२१ व्या शतकात धनाच्या मागे धावणाऱ्या समाजाची बाजू न घेता, वनांच्या वाघांची बाजू घेऊन ‘वाघ’ हे ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशित केले, त्याबाबत ‘लोकसत्ता’चे कौतुक. महाराष्ट्रात वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या कामाचे जगाने कौतुक करावे, यादृष्टीने आपण निश्चित काम करू. त्यासाठी हे ‘कॉफी टेबल बुक’ दिशादर्शक ठरेल, असे कौतुकोद्गार मुनगंटीवार यांनी काढले. वनसंपदेच्या संवर्धनासाठी असेच काम करत राहा, अशा शुभेच्छा त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिल्या.
‘व्याघ्रसंवर्धनात लोकसहभाग महत्त्वाचा’
महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाच्या कामगिरीची ‘डरकाळी’ नोंदवणाऱ्या ‘वाघ’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ादरम्यान ‘वाघ- अधिवासाचं आव्हान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नितीन काकोडकर आदी मान्यवरांनी वाघांची वाढती संख्या, त्यांचा सुरक्षित अधिवास, महाराष्ट्र वन्यजीव आराखडा, राज्यात वाघांची होणारी शिकार, त्यावरील उपाययोजना, वाघ – मानव संघर्ष आदी अनेक पैलूंचा आढावा घेतला. व्याघ्रसंवर्धनात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. वाघासाठी त्याच्या अधिवासात सुरक्षित वातावरण निर्माण झाले तर मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कमी होईल, असे मत तज्ज्ञांनी या परिसंवादात व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्र) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी वाघांच्या छायाचित्रांसह व्याघ्रसंवर्धनाच्या अनुभवांबाबत सादरीकरण केले. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी राखी चव्हाण यांनी मान्यवरांशी संवाद साधला.