राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर, अँटीजेन, अँटीबॉडीज चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून हे दर सोमवारपासून लगेच लागू झाले आहेत. रुग्णाने प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी केल्यास सध्याच्या ५०० रुपयांऐवजी आता ३५० रुपये आकारले जातील.

राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर व अन्य चाचण्यांचे दर गेल्या दीड वर्षात काही वेळा कमी केले असून सध्या ३१ मार्च २०२१ रोजी निश्चित केलेले दर लागू आहेत. करोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर व अन्य चाचण्यांचे दर पुन्हा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाहतूक, पीपीई किट व अन्य खर्च, कर यासह हे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.

रुग्णालय किंवा करोना केंद्रातून रुग्णाचे स्वॅब नमुने घेतल्यास सध्याच्या ६०० रुपयांऐवजी ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास ८०० रुपयांऐवजी ७०० रुपये दर आकारला जाईल.

अँटीबॉडीजच्या एलिसा चाचणीसाठी रुग्ण प्रयोगशाळेत गेल्यास २०० रुपये, एखाद्या केंद्रावरून नमुने घेतल्यास २५० रुपये व रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास ३५० रुपये आकारले जातील. तर क्लिआ चाचणीसाठी याच पद्धतीने अनुक्रमे ३००,४०० व ५०० रुपये आकारले जातील. रॅपिड अँटीजेन चाचणीसाठी याचप्रकारे अनुक्रमे १००,१५० व २५० रुपये दर आकारला जाईल. खासगी प्रयोगशाळांना हे दर बंधनकारक असून त्यापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास राज्य सरकारकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

मुंबईत १६८ नवे बाधित

मुंबई : मुंबईत रविवारच्या तुलनेत सोमवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. सोमवारी १६८ नवे  रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर सोमवारी २५० जण करोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या ७ लाख ६४ हजार ३ वर पोहोचली असून करोनामुक्त झालेल्यांचीही एकूण सख्या ७ लाख ४३ हजार ३६५ इतकी आहे. 

राज्यात ५१८ बाधित

सोमवारी ५१८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात  पुणे जिल्हा ८४,  नगर जिल्हा ३८, मराठवाडा ३२, विदर्भ १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. 

ठाणे जिल्ह््यात ९१ जणांना संसर्ग

ठाणे :  जिल्ह्यात सोमवारी ९१ रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील रुग्णांपैकी ठाणे ३२, नवी मुंबई २७, कल्याण-डोंबिवली १२, ठाणे ग्रामीण आठ, मीरा-भाईंदर आठ, अंबरनाथ दोन, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. तर ठाणे ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.