मुंबई : आयआयटी मुंबईचे टेकफेस्ट म्हणजे तंत्रज्ञानप्रिय व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. विज्ञान व तंत्रज्ञानला प्राधान्य असलेल्या टेकफेस्टमधील प्रदर्शन केंद्राला शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तंत्रज्ञान प्रेमींनी गर्दी केली होती. या प्रदर्शनात मांडण्यात आलेले संशोधन हे प्रामुख्याने विकासावर भर देणारे होते.

नृत्य करणाऱ्या रोबोने जिंकली उपस्थितांची मने

मध्यप्रदेशमधील ‘बिद्युत इनोव्हेशन’ने तयार केलेला रोबो टेकफेस्टच्या प्रदर्शनात सादर करण्यात आला. हा रोबो सहजपणे हालचाली करत होता. मात्र त्याचवेळी त्याने केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांची मने जिंकली. हा रोबो पाहण्यासाठी आणि त्याची चित्रफित काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे हा रोबो वस्तू उचलून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज नेत होता.

चेहऱ्यावरील अचूक भाव दर्शविणारा रोबोट

रोबोट हा अधिकाधिक माणसांप्रमाणे दिसावा यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. तामिळनाडूमधील झायबोटिक या कंपनीने तयार केलेला रोबोट सुद्धा लोकांच्या पसंतीस पडत होता. हा रोबोट डोळे मिचकावणे, डोळा मारणे, भुवया उंचावणे, नाक उडवणे, ओठांवर जीभ फिरवणे असे अनेक प्रकार सहज करत होता. हा रोबोट साधारणपणे चित्रपटांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आल्याचे झायबोटिकचे संचालक हावीश यांनी सांगितले.

समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती

समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. मात्र आयआयटी मुंबईच्या ओशियन इंजिनियरिंग या विभागाने समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र समुद्रामध्ये किनाऱ्याच्या जवळ लावण्यात येते. समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटांचे पाणी या तंत्राद्वारे तयार केलेल्या एका विशिष्ट जागेमध्ये शिरते. त्या ठिकाणी लाटांमुळे हवेचा दाबा कमी अधिक होऊन टरबाइन फिरू लागते. टरबाइन फिरल्यामुळे वीज निर्मिती होते. या तंत्रामुळे समुद्रातील माशांना कोणताही धोका निर्माण होत नाही.

नाल्यातील कचरा हटविण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान

उघड्या नाल्यांमधील व कालव्यांमधील तरंगत्या कचऱ्यावर प्रभावी उत्तर देणारे स्वदेशी तंत्रज्ञान आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. ‘ओपन वॉटर चॅनल्समधील तरंगता कचरा हटविण्याची प्रणाली’ असे या तंत्रज्ञानाचे स्वरूप असून, नदी, नाले, कालवे तसेच उघड्या जलवाहिन्यांमध्ये साचणारा प्लास्टिक, कचरा, जैव-अवशेष आणि इतर घन पदार्थ कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना हटविणे हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. ही प्रणाली तीन टप्प्यांत कार्य करते.

पहिल्या टप्प्यात जलवाहिनीत तरंगती उभी जाळी बसवली जाते, जी संपूर्ण रुंदीभर पसरून तरंगता कचरा अडवते. दुसऱ्या टप्प्यात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामुळे हा अडवलेला कचरा काठाकडे वळवण्यात येतो. अंतिम टप्प्यात स्वयंचलित कन्वेयर बेल्ट यंत्रणेद्वारे हा कचरा बाहेर काढून ठरावीक ठिकाणी संकलित केला जातो.

चाचणीदरम्यान जवळपास ८० टक्के तरंगता प्लास्टिक कचरा प्रभावीपणे गोळा करण्यात आला. यामुळे नाले तुंबण्याचा धोका कमी झाला. कमी खर्चात अधिक कार्यक्षमतेने काम करणारी, ऊर्जा-कार्यक्षम, देखभाल सुलभ आणि पूर्णपणे स्वयंचलित अशी ही प्रणाली शहरी स्वच्छता व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरणार आहे.