न्यायालयाच्या आदेशाला अनेक महाविद्यालयांकडून केराची टोपली

अकरावीत ऑफलाइन प्रवेश देऊ नयेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व त्यानुसार शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकाला मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्य़ातील काही महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवत ऑफलाइन प्रवेश दिले आहेत. मात्र, शिक्षण विभागाने हे प्रवेश ग्राह्य़ धरले जाणार नसल्याचे जाहीर केल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.

न्यायालयाचे आदेश डावलून अनेक महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिल्याच्या तक्रारी आल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयाने एका भरारी पथकाची स्थापना केली. या पथकाने केलेल्या पाहणीत अनेक महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश दिल्याचे उघडकीस आल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. ऑफलाइन प्रवेश देताना महाविद्यालयांनी नाना प्रकारच्या शक्कल लढवल्याचेही या पाहणी आढळून आले. ऑफलाइन प्रवेशासाठी अनेक महाविद्यालयांनी वेगवेगळ्या रंगाच्या पावत्या विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत. पावतीवर महाविद्यालयाचे किंवा इतर कोणाचेही नाव नसून एक विशिष्ट खूण आहे, असे भरारी पथकातील एका सदस्याने सांगितले. तर अनेकांनी ऑफलाइन प्रवेशाची यादी करून ठेवली असून ती ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही भरारी पथकाच्या हाती लागली आहे.

प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रक्रियेत नोंदणी केली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी काही कारणाने त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे. १९ जुलैनंतर अशा विद्यार्थ्यांना त्यांना ऑनलाइन प्रक्रियेत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी दिली जाणार आहे. जेणेकरून कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी सांगितले.

ऑफलाइन प्रवेश होऊच शकत नसल्यामुळ तसे प्रवेश कोणी दिले असतील तर ते ग्राह्य़ धरले जाणार नाहीत. त्यामुळे पालकांनीची याबाबत सजगता बाळगून अशा प्रकारांची माहिती उपसंचालक कार्यालयाकडे द्यावी.
बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक