scorecardresearch

‘जी. ए. सॉफ्टवेअर’ यापूर्वीही काळ्या यादीत; शिक्षक पात्रता भरतीसह अन्य परीक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका

म्हाडातील ५६५ जगांसाठी रविवारपासून भरती परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेसाठी काही तास शिल्लक असतानाच रात्री उशिरा म्हाडाने ती रद्द केली. 

(प्रातिनिधिक छायाचित्र)

|| मंगल हनवते

शिक्षक पात्रता भरतीसह अन्य परीक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका

मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदार जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीवर यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी शिष्यवृत्ती परीक्षा आणि अन्य परीक्षेत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीला काळ्यायादीतही टाकण्यात आले होते. मात्र महाआयटीकडून मार्च २०२१ मध्ये पुन्हा सरळसेवा भरतीसाठी जी ए सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार म्हाडाने या कंपनीची नियुक्ती केली. पण आता म्हाडा भरती परीक्षा गैरव्यवहारानंतर म्हाडाने या कंपनीची विश्वासार्हता तपासली होती का? महाआयटीने काळ्या यादीतील कंपनीला दोषमुक्त कसे केले? आणि पुन्हा कंपनीची नियुक्ती कशी केली? असे प्रश्न परीक्षार्थींकडून उपस्थित केले जात आहेत.

म्हाडातील ५६५ जगांसाठी रविवारपासून भरती परीक्षा होणार होती. मात्र परीक्षेसाठी काही तास शिल्लक असतानाच रात्री उशिरा म्हाडाने ती रद्द केली.  त्यानंतर भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याची, पेपरफुटीचा प्रयत्न झाल्याची माहिती उघडकीस आली. महत्त्वाचे म्हणजे हा गैरप्रकार, पेपरफुटीचा प्रयत्न म्हाडा भरती परीक्षेचे काम पाहणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीकडूनच झाल्याची बाब उघड झाली. पुणे सायबर पोलिसांनी कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुखला पेपर फोडण्याचा प्रयत्न करताना पकडले, तर इतर पाच दलालांनाही अटक करून पेपर फोडणाऱ्या टोळीचा छडा लावला असून पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

दंडाची कारवाई

जी ए सॉफ्टवेअर कंपनीने यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी शिष्यवृत्ती परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस आदी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षांमध्ये गोंधळ घातल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, तर या वृत्ताला महाआयटी आणि म्हाडाकडून दुजोरा देण्यात आला आहे. या कंपनीला गैरप्रकारप्रकरणी आधी ९० लाख रुपये आणि नंतर २५ लाख रुपये दंड ठोठावून काळ्या यादीत टाकण्यात आले. मात्र ३० सप्टेंबर २०२० मध्ये महाआयटीने या कंपनीला काळ्या यादीतून वगळले. त्यानंतर ४ मार्च २०२१ मध्ये सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या कंपन्यांच्या यादीत या कंपनीचा समावेश केल्याची माहिती म्हाडातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली, तर या कंपनीला काळ्या यादीतून वगळत पुन्हा सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी समाविष्ट केल्याचे महाआयटीचे मुख्य संचालक अधिकारी प्रसाद कोलते यांनी सांगितले.

चौकशी व्हावी- विनोद घोसाळकर

याआधी काळ्या यादीत असलेल्या, अनेक गैरप्रकार केलेल्या कंपनीची म्हाडाने निवड केल्याचे लक्षात आल्याबरोबर याबाबत आपण सरकारकडे आणि म्हाडाकडे लेखी तक्रार केली होती. त्याचा पाठपुरावाही करीत होतो. मात्र कुणाकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी गैरप्रकार होण्याची भीती खरी ठरल्याचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. महाआयटीच्या यादीत ही कंपनी असली तरी म्हाडाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.

जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न

या गैरप्रकारानंतर म्हाडा आणि महाआयटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असताना या दोन्ही यंत्रणा मात्र एकमेकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. याविषयी महाआयटीकडे विचारणा केली असता याआधी काळ्या यादीत ज्या कंपन्या होत्या त्यांची काय चौकशी झाली, त्यांच्याकडून कोणती कागदपत्रे घेतली, निविदा करताना कोणती काळजी घेतली याची संपूर्ण माहिती संबंधित विभागाला दिली होती अशी प्रतिक्रिया कोलते यांनी दिली. म्हाडाने मात्र आपण महाआयटीने निवडलेल्या पाच कंपन्यांमधून एक कंपनी निवडली असल्याचे म्हणत महाआयटीकडे बोट दाखवले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: G a software already blacklisted abnormalities in other examinations including teacher qualification recruitment akp

ताज्या बातम्या