मुंबई : गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटाशी संबंधित प्रकरणात आरोपी सत्यनारायण राणी याचा सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने राणी याची दोषमुक्तीची याचिका फेटाळताना नमूद केले आहे. आरोपीचा बंदी घातलेल्या सीपीआय (एम)शी संबंध असल्याचा गंभीर संशय असून या संघटनेने देशात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचला होता. तसेच, राणी याच्यासह इतर सहआरोपी हे मोठ्या कटाचा एक भाग होते हे पुराव्यांतून सकृतदर्शनी स्पष्ट होते, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने राणी याची दोषमुक्तीची याचिका फेटाळताना म्हटले. त्याचप्रमाणे, या खटल्यातून याचिकाकर्त्याला मुक्त करण्यास नकार देणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशात कोणतीही त्रूटी आढळली नसल्याचेही न्यायलयाने आदेशात नमूद केले. हेही वाचा - शिंदे गटाच्या आणखी एका खासदाराच्या निवडीला आव्हान हेही वाचा - घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेची अटक कायदेशीरच, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली दरम्यान, आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर खटल्यातील अतिरिक्त पुरावे म्हणून काही साक्षीदारांचे म्हणणे सादर करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने तपास यंत्रणेला दिली होती. विशेष न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देणारी राणीची दुसरी याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली. अन्य एका प्रकरणात तपास अधिकाऱ्याने नोंदवलेले जबाब सध्याच्या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल न करता सादर करण्याची मागणी विशेष न्यायालयाने कशी मान्य केली. उपरोक्त अवलंबलेली पद्धत कायद्याला अनुसरून नसल्याचे नमूद केले. तसेच, अतिरिक्त पुरावे सादर करण्याचा तपास यंत्रणेला परवानगी देणारा विशेष न्यायालयाचा आदेश न्यायालयाने रद्द करताना स्पष्ट केले.