मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात आदिवासी विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या उपोषणाची उच्च न्यायालयाने शनिवारी दखल घेतली. तसेच, या विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. यापुढे आणखी कोणत्याही तरुणांचा बळी जाऊ नये, असेही न्यायालयाने यावेळी सरकारला बजावले.

गडचिरोली जिल्ह्यातील जपतालाई गावातील एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूच्या निषेधार्थ राज्यातील, विशेषतः आदिवासी पट्ट्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. शाळेतील आणखी तीन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी दखल घेतली. तसेच, उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरेसा आणि वेळेवर वैद्यकीय उपचार कसा मिळेल यासाठी योग्य उपाययोजना करा. त्यांच्यासाठी डॉक्टर सतत उपलब्ध असतील याची खात्री करा आणि गरज भासल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत किंवा अन्न देण्यासाठी रुग्णालयात दाखल करा, असे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला यावेळी दिले.

त्यावर, सरकारने या प्रकरणी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना करण्यात केल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी ३१ ऑगस्टला ठेवली. तसेच, याबाबतचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले.

प्रकरण काय ?

गडचिरोलीतील आदिवासीबहुल जपतालाई येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या आवारात ६५ मुली राहत होत्या. त्यापैकी सहा मुलींना सर्पदंश झाला व त्यात दोघींचा मृत्यू झाला, एकीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर चौथीची प्रकृती गंभीर असून तिला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यभरातील मुलींच्या वसतिगृहाच्या दुरावस्थेवर विद्यार्थांनी आवाज उठवला असून पुण्याजवळ मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी विविध शैक्षणिक व कल्याणकारी मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ बेमुदत उपोषनाला बसले आहेत.