मिथुन तारकासमूहातून रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत दर्शन

अवकाशाबद्दलचे कुतूहल वाढवणाऱ्या अनेक घटनांपैकी एक म्हणजे उल्कावर्षांव. मिथुन तारकासमूहातील उल्कावर्षांव पाहण्याची संधी आज, सोमवारी रात्री नऊपासून पहाटे तीन वाजेपर्यंत मिळणार आहे. तासाला सरासरी ७० उल्का आकाशात दिसणार असून चंद्रास्तानंतर हा उल्कावर्षांव होणार असल्याने तो स्पष्ट दिसण्याचा अंदाज अवकाश अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. भारतीय वेळेप्रमाणे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उल्कावर्षांवाची पातळी सर्वोच्च असेल.
ग्रह, लघुग्रह, धुमकेतू आदी खगोलीय वस्तूंचे विखुरलेले तुकडे सौरमालेत फिरत असतात. या धुलिकणांच्या कक्षेतून पृथ्वी जात असल्यास हे कण पृथ्वीवर पडल्याप्रमाणे वातावरणात येतात. पृथ्वीच्या वातावरणात शिरताच घर्षणाने ते पेट घेतात. या पेटलेल्या तुकडय़ांना उल्का म्हटले जाते. ज्या तारकासमूहातून उल्कावर्षांव होताना दिसतो त्या तारकासमूहाच्या नावाने तो उल्कावर्षांव ओळखला जातो. १४ डिसेंबर रोजी मिथुन तारकासमूहातील कॅस्टर या ताऱ्याच्या दिशेने उल्कावर्षांव होताना दिसेल, अशी माहिती नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. एकेकाळी धूमकेतू असलेला मात्र त्यानंतर लघुग्रहात रूपांतर झालेल्या फेथॉनच्या तुकडय़ांमुळे हा वर्षांव होणार असून दरवर्षी साधारण या काळात ही घटना घडते. मात्र या वेळी या वर्षांवाची तीव्रता मध्यरात्रीच्या सुमारास असल्याने तसेच त्याआधी तीन तास चंद्रास्त झाल्याने, आभाळ निरभ्र असल्यास भारतातून ही घटना चांगली दिसण्याची शक्यता आहे.

उल्कावर्षांव पाहण्यासाठी काय करावे?
’ उल्कावर्षांव साध्या डोळ्यांनीही दिसतो.
’ शहरातील प्रकाश प्रदूषणामुळे गावातून हा वर्षांव पाहणे निश्चितच अधिक चांगले. मात्र तशी शक्यता नसल्यास डोळ्यांवर थेट प्रकाश येत नसलेली जागा निवडावी.
’ थंडी असल्याने उबदार कपडे घालावेत. आरामखुर्ची असल्यास उत्तम.
’ मध्यरात्रीपर्यंत आपल्या डोक्याच्या थेट वर उल्कावर्षांव होताना दिसेल. त्यानंतर पश्चिम दिशेला ४५ अंशांच्या कोनात उल्कावर्षांव दिसेल.
’ या वर्षांवातील उल्का गटागटाने येतात. साधारण चार मिनिटांच्या अंतराने एकदम चार-पाच उल्का दिसतात.