मुंबई : चीन बनावटीचा राेबोट आपणच विकसित केल्याचा दावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मान खाली घालण्याची वेळ आणणाऱ्या गलगोटिया विद्यापीठाला पुन्हा एकदा नव्या प्रकल्पासाठी ४२ लाख रुपये संशोधन निधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (डीएसटी) राबविण्यात येत असलेल्या आंतरविद्याशाखीय सायबर-फिजिकल सिस्टीम या राष्ट्रीय अभियान हा संशोधन निधी देण्यात आला आहे.
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या एआय समिटमध्ये चीनमधील कंपनीकडून खरेदी केलेला यंत्र श्वान (रोबोट डॉग) विद्यापीठात तयार केल्याच्या दाव्यावरून उत्तरप्रदेशातील गलगोटीया विद्यापीठ चर्चेत आले होते. विद्यापीठाने केलेल्या बनवाबनवीमुळे जागतिक पातळीवर देशाची नाचक्की झाली. त्याचवेळी संशोधन निधी, संशोधनाची गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांबाबत प्रश्न उभे राहिले. गलगोटीया विद्यापीठाच्या एआय समीटव्यतिरिक्तही इतर काही प्रकल्पांबाबतही प्रश्न उपस्थित झाले. असे असतानाही या विद्यापीठाला नव्या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला आहे. देशातील अनेक संस्था, विद्यापीठे संशोधननिधीपासून वंचित असताना गलगोटीया विद्यापीठाला शासकीय यंत्रणांकडून झुकते माप देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या आंतरविद्याशाखीय सायबर-फिजिकल सिस्टीम्सवरील राष्ट्रीय अभियानांतर्गत (एनएमआयसीपीएस) आयआयटी मुंबई येथे टीआयएच-आयओटी (टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब) हब उभारण्यात आले आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत विविध विद्यापीठे, शिक्षणसंस्थांना संशोधनासाठी निधी देण्यात येतो. त्यात आंबा आणि कलिंगड पिकल्याची अचूक माहिती देणारे ‘इंटेलिजंट रिपनिंग डिटेक्टर’ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबईकडून ४२ लाखांचा संशोधन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे विद्यापीठाकडून माध्यमांना सांगण्यात आले.
आंबा आणि टरबूजासाठी बुद्धिमान पक्वता ओळख यंत्रणा विकसित करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक म्हणून विद्यापीठातील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अग्निव तपदार काम पाहणार आहेत. या संशोधनाचा मुख्य उद्देश कमी खर्चिक, पोर्टेबल आणि बुद्धिमान अशी पक्वता ओळखणारी प्रणाली विकसित करणे हा आहे. याबाबत आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शिरीष केदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
