मुंबई : चीनी बनावटीचा रोबोट आपणच विकसित केल्याचा दावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मान खाली घालण्याची वेळ आणणार्‍या गलगोटिया विद्यापीठाला ‘आयआयटी मुंबई’कडून नव्या प्रकल्पासाठी ४२ लाख रुपये संशोधन निधी देण्यात आला आहे. आंबा व कलिंगड पिकल्याची माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हा संशोधन निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या ‘एआय परिषदे’मध्ये चीनमधील कंपनीकडून खरेदी केलेले रोबोट डॉग विद्यापीठाने तयार केल्याच्या दाव्यावरून उत्तर प्रदेशातील गलगोटिया विद्यापीठ चर्चेत आले होते. विद्यापीठाने केलेल्या बनवेगिरीमुळे जागतिक पातळीवर देशाची नाचक्की झाली. त्याचवेळी संशोधन निधी, संशोधनाची गुणवत्ता अशा अनेक मुद्द्यांबाबत प्रश्न उभे राहिले. असे असतानाही या विद्यापीठाला नव्या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला आहे. देशातील अनेक संस्था, विद्यापीठे संशोधननिधीपासून वंचित असताना गलगोटिया  विद्यापीठाला शासकीय यंत्रणांकडून झुकते माप देण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे (डीएसटी) राबविण्यात येत असलेल्या आंतरविद्याशाखीय सायबर-फिजिकल सिस्टीम या राष्ट्रीय अभियानअंतर्गत (एनएमआयसीपीएस) आयआयटी मुंबई येथे टीआयएच-आयओटी (टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब) हब उभारण्यात आले आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत विविध विद्यापीठे, शिक्षणसंस्थांना संशोधनासाठी निधी देण्यात येतो. त्यात आंबा आणि कलिंगड पिकल्याची अचूक माहिती देणारे ‘इंटेलिजंट रिपनिंग डिटेक्टर’ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आयआयटी मुंबईकडून गलगोटिया विद्यापीठाला ४२ लाखांचा संशोधन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे विद्यापीठाकडून माध्यमांना सांगण्यात आले. याबाबत आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शिरीष केदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

रक्कम कशासाठी?

’आंबा आणि टरबुजासाठी पुरेशी पक्वता ओळख यंत्रणा विकसित करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.

’या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक म्हणून विद्यापीठातील इले्ट्रिरकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. अग्निव तपदार काम पाहणार आहेत.

’या संशोधनाचा मुख्य उद्देश कमी खर्चीक, पोर्टेबल आणि पुरेशी अशी पक्वता ओळखणारी प्रणाली विकसित करणे हा आहे.