मुंबई : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घरोघऱी लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या विषयांवरील देखाव्यांचे काम अंतिम टप्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा गणेशोत्सवानिमित्त संत परंपरेवर आधारित भव्य देखावा साकारत आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा मराठी संस्कृतीचा कणा आणि सामाजिक समतेचा पाया आहे. राज्यातील संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे दर्शन या देखाव्यातून घडविण्यात येणार आहे.

गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या देखाव्यात संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन विशेष आकर्षण ठरणार आहे. सुमारे ५० फूट उंचीच्या गरुडावर आरूढ होऊन संत तुकाराम वैकुंठाला जात असल्याचे भव्य दृश्य साकारण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांचा अहंकार जिरवण्यासाठी योगशक्तीचा वापर करून भिंत चालवली, हा वारकरी संप्रदायातील एक प्रसिद्ध प्रसंग आहे. हा प्रसंगही देखाव्यात उभा केला आहे. तसेच माती मळताना संत गोरा कुंभार भक्तीत इतके तल्लीन झाले की स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला जात असल्याचेही त्यांना भान राहिले नव्हते, हा प्रसंगही विशेष रुपात उभारण्यात आला आहे. विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेली वैष्णवांची वारी आणि वारकरी संस्कृतीची झलक मुंबईकरांना गणेश गल्लीत अनुभवायला मिळणार आहे.

सुरक्षेवर विशेष भर

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंडळाने सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मंडळाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांना विमा संरक्षण दिले आहे. गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी सांगितले की, संतांच्या विचारांचा आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या देखाव्यातून केला आहे. भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेला हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरेल अशी अपेक्षा आहे. यंदा मंडळाचे ९९ वे वर्ष आहे.