रस्त्यांवरील आणि त्यातही पराकोटीचा गोंगाट करणारे धार्मिक सण बंदच केले पाहिजेत, असे परखड मत व्यक्त करताना गणेश मंडळे तर खंडणीखोर झाल्याचा सणसणीत टोला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी हाणला.
शिवाजी पार्कवर जगन्नाथ यात्रा आणि मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर करू देण्याची परवानगी देण्याच्या मागणीसाठी ‘इस्कॉन’ने पुन्हा एकदा नव्याने याचिका केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी फणसाळकर यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने मुंबईतील रस्त्यांवरील गोंगाटांचे उत्सव तसेच मंडळांबाबत परखड मत व्यक्त केले. जगन्नाथ यात्रा असो, गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव असो, रस्त्यावरील आणि खुल्या मैदानातील सर्वधर्मीय सणांना आमचा विरोध आहे. एवढेच नव्हे, तर असे रस्त्यावर वा खुल्या मैदानात साजरे करण्यात येणारे आणि गोंगाटाचे उत्सव बंदच करायला हवेत, असे आमचे ठाम मत असल्याचे न्यायालयाने सुनावले. या सणांचा फायदा कुणाला होतो, असा सवाल करत उलट गणेश मंडळे या धार्मिक सणांच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचा टोलाही न्यायालयाने हाणला. हे सण गोंगाटाशिवाय साजरे केले जाऊ शकत नाहीत का, अशी विचारणा करताना सणच साजरे करायचे तर घरात साजरे करावेत, असेही न्यायालयाने म्हटले.
तत्पूर्वी, शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून ते शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी उच्च न्यायालयाने वर्षांतील काही दिवस वगळता तेथे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मज्जाव केलेला आहे. आपल्या संस्थेला मात्र उच्च न्यायालयाने यापूर्वीही सशर्त परवानगी दिली होती, काही महिन्यांपूर्वी अन्य खंडपीठाने ती नाकारली, असे सांगताना या रथयात्रेला परवानगी देण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.