मुंबईः सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला जीवंत नागाची पूजा करण्याच्या प्रथेवरील बंदी उठविण्याच्या हालचाली शासनदरबारी सुरू झाल्या आहेत. जलीकट्टू आणि बैलगाडा शर्थतीच्या धर्तीवर नागपंचमीही पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्याबाबत पुढील आठवड्यात केंद्रीय वनमंत्र्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
सत्यजित देशमुख. जयंत पाटील. गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून बत्तीस शिराला येथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्याची मागणी केली. या गावात जिवंत नागाची पूजा करण्याची कित्येक वर्षांपासूनची परंपरा असून जलीकट्टू व बैलगाला शर्यतीस कायद्याची बाधा न येता ज्याप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने जीवंत नागाची पूजा करण्यासही परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जीवंत नागाची पुूजा करण्यास उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बंदी घालण्यात आली आहे. मात्र लोकांच्या भावना लक्षात घेऊन जलीकट्टू आणि बैलगाडा शर्थतीच्या धर्तीवर जीवंत नागाची पूजा करण्यास अनुमती देण्याबाबत केंद्रीय वनमंत्र्याना विनंती करण्यात आली असून त्याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.