मुंबई: कांदळवनावर अतिक्रमण करणाऱ्या कोणत्याही कंपन्या असल्या तरी त्यांचे अतिक्रमण हटवले जाईल. मुंबईत कांदळवनावर झालेले अतिक्रमण शून्य करण्यासाठी पालिका, पोलिस आणि वन विभागाची एक बैठक आयोजित केली जाईल, असे वनेमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.
बोरिवली विधानसभा क्षेत्रातील खाडी किनाऱ्यावर असलेल्या कांदळवनाची तोड केली जात आहे. या जमिनीवर भराव टाकून सपाटीकरण केले जात आहे. या जमिनीवर काही ऑनलाईन अन्न पुरवठा करणाऱ्या कंपन्याचे साठवण केंद्र उभारले गेली आहेत. कांदळवन हे खाडीकिनारी शहराचे संरक्षण भिंत आहेत. भरती ओहोटीचा परिणाम कमी करणे हे या कांदळवनामुळे शक्य आहे. कांदळवनांचे संरक्षण केले गेले नाही तर मुंबईला भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशी लक्षवेधी भाजपचे संजय उपाध्याय यांनी मांडली. कांदळवन नष्ट करणाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
