मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजा व इतर विसर्जन मिरवणुकीत उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत सराईत चोरांच्या टोळ्यांनी भाविकांचे मोबाइल फोन व सोन्याचे दागिने लांबवले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाइल गहाळ व चोरीप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत सुमारे २०० हून अधिक तक्रारी आल्या असून, पोलिसांनी १९२ मोबाइल फोन गहाळ झाल्याची अधिकृत नोंद केली आहे. याशिवाय मोबाइल व सोनसाखळी चोरीप्रकरणी १० स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत याप्रकरणी दोन महिला व एका अल्पवयीन मुलासह एकूण १८ आरोपींना अटक केली.

गणरायाला निरोप देण्यासाठी लालबाग, परळ व गिरगाव चौपाटी परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. मध्य मुंबईतील लालबागचा राजाच्या मिरवणूक मार्गावर झालेल्या तुफान गर्दीचा फायदा परराज्यातील व स्थानिक सराईत पाकिटमारांच्या टोळ्यांनी घेतला. भाविकांचे लक्ष नसताना खिशातील मोबाइल फोन, गळ्यातील सोन्याच्या साखळी व महिलांच्या पर्स लांबवण्याचे प्रकार घडले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या चोरीच्या प्रकारात संघटित टोळ्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले असून, चोरीसाठी लहान मुले व महिलांचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. मिरवणुकीत भाविकांच्या पर्स पळवताना दोन महिलांना मुद्देमालासह पकडण्यात आले.

चोरीच्या वाढत्या तक्रारींनंतर मुंबई पोलिसांनी मिरवणूक मार्गावर साध्या वेषातील पोलीस पथके तैनात केली. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून आतापर्यंत चोरीचे १४ स्मार्टफोन व सात सोनसाखळी जप्त करण्यात आल्या. उर्वरित चोरी गेलेला ऐवज व मोबाइल हस्तगत करण्यासाठी पकडण्यात आलेल्या आरोपींच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

मिरवणूक मार्गावरील लालबाग, चिंचपोकळी, भारतमाता जंक्शन व गिरगाव चौपाटी परिसरातील शेकडो सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलीस तपासून पाहत आहेत. तसेच चोरी झालेल्या मोबाइल फोनचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांचा सायबर सेल व तांत्रिक विश्लेषण शाखा ‘सीईआईआर’ पोर्टलच्या मदतीने फोनच्या आयएमईआय क्रमांकाचा शोध घेत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.