मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २०० आरक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्यांना मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. यावर्षी मध्य रेल्वेने एकूण २६२ गणपती विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

या २६२ फेऱ्यांमध्ये २०० आरक्षित विशेष रेल्वेगाड्यात वातानुकूलित, शयनयान व सामान्य डब्यांच्या मिश्र रचनेसह; तसेच ६२ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्या मुंबई, पुणे व नागपूरहून कोकणातील विविध ठिकाणांसह गोव्यापर्यंत धावणार आहेत. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०० आरक्षित विशेष रेल्वेगाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२ फेऱ्या, रत्नागिरीसाठी ६४ फेऱ्या व मडगावसाठी २४ फेऱ्या आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना आगाऊ नियोजन करून, मूळगावी जाऊन कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करणे अधिक सोयीचे होणार आहे.

गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाय

गणेशोत्सवातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विविध स्थानकांवर विशेष व्यवस्था केली आहे. अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रमुख स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विश्रामगृह तयार केले जाणार आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोफत पिण्याचे पाणी, अन्न व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांमध्ये शिस्तबद्ध चढ-उतारासाठी रांग व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तसेच वैध तिकीट व ओळखपत्र सोबत ठेवून प्रवास करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. तर, जादा गर्दीच्या स्थानकावर आरपीएफ व तिकीट तपासनीसांची अतिरिक्त नियुक्ती केली जाणार आहे. तिकीट तपासनीसांद्वारे उद्घोषणा करून, गर्दीचे नियोजन केले जाईल. तसेच ज्याठिकाणी गर्दी जादा जमा झाली असेल, तिथे आरपीएफ जवान जाऊन, गर्दी नियंत्रणात आणतील. यासह नियंत्रण कक्षाद्वारे रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक घटनांची अद्ययावत माहिती दिली जाईल.

आरक्षण सुविधा

विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण केंद्रांवर (पीआरएस); तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी नियमित दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट काढता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी रेलवन ॲपचाही वापर करता येईल. या विशेष रेल्वेगाड्यांच्या विविध स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या एनटीइएस प्रणालीचा किंवा एनटीइएस ॲपचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.