मुंबई : पैठणी, हिमरू शाल, करवत काठी, घोंगडी आणि खण यांसारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा वारसा जपणाऱ्या हातमाग विणकरांना यंदा गणेशोत्सवापूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या ‘उत्सव भत्ता’ योजनेसाठी वित्त विभागाने १ कोटी २५ लाख ९७ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. या निधीतून पात्र महिला आणि पुरुष विणकरांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाईल.

राज्यातील पैठणी, हिमरू आणि करवत काठी या वस्त्रांना भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले असून, या पारंपरिक कलेचे संवर्धन करण्यासाठी सरकारने २०२३ मध्ये ‘एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८’ अंतर्गत ही योजना सुरू केली होती.

या योजनेंतर्गत पात्र पुरुष विणकरांना १० हजार रुपये, तर महिला विणकरांना १५ हजार रुपये उत्सव भत्ता दिला जातो. यंदा १,३५६ महिला आणि २,७४५ पुरुष, अशा एकूण ४,१०१ विणकरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अर्थसंकल्पात ६.२९ कोटींची तरतूद

२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ६ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाने त्यापैकी ४ कोटी ७७ लाख रुपये वितरित करण्याची मागणी केली होती. मात्र, वित्त विभागाने नियमानुसार एकूण तरतुदीच्या २० टक्के रक्कम म्हणून १ कोटी २५ लाख ९७ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे.

पुढील हप्ते कधी?

पहिल्या हप्त्याचा खर्च योग्य प्रकारे झाल्याचा उपयोगिता दाखला वस्त्रोद्योग विभागाने सादर केल्यानंतर उर्वरित निधीचे पुढील हप्ते ३ ते ४ महिन्यांत वितरित केले जाणार आहेत.

योजना काय?

मे २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या ‘एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८’ अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. राज्यातील पैठणी, हिमरू शाल, करवत काठी, घोंगडी आणि खण या पाच पारंपरिक हातमाग क्षेत्रांतील नोंदणीकृत विणकरांना दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त हा विशेष उत्सव भत्ता दिला जातो.