फटाक्यांची आतषबाजी, वाद्यांचा दणदणाट, मिरवणुका रद्द

मुंबई : वाजंत्री, गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत तासन्तास चालणाऱ्या मिरवणुका, ठिकठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, वाहतूक कोंडी हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिसणारे दृश्य यंदा विरळच ठरणार आहे.

गणेश गल्लीतील गणपतीची मिरवणूक सकाळी लवकर सुरू होते. लाखो लोकांच्या जनसमुदायात ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्ती गिरगाव चौपाटीकडे प्रस्थान करते. परंतु यंदा मंडपाच्या आवारातच विसर्जन होणार असल्याचे मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले. ‘दरवर्षीसारखा जल्लोष या वेळी कुठेही दिसणार नाही. सायंकाळी ४.३० वाजता पूजा करून गणेशाला निरोप दिला जाईल. अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांचा हा सोहळा असेल. विसर्जनाचे थेट प्रक्षेपण घराघरात पोहोचवण्यासाठी खास यंत्रणा उभी केली आहे,’ असे ते सांगतात. उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खेतवाडीत आदल्या दिवशीच विसर्जनाची लगबग सुरू होते. मूर्ती उंच असल्याने मंडप सोडणे, रस्ते मोकळे करणे अशी बरीच कामे कार्यकर्त्यांपुढे असतात. एकामागोमाग एक बाराही गल्ल्यांचे गणपती विसर्जनाला निघतात. त्यामुळे पहाटे पाचलाच ढोल-ताशे दणाणू लागतात. यंदा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चौपाटी गाठणार असल्याची माहिती मुंबईचा सम्राट, ६वी खेतवाडी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली. ‘विसर्जनासाठी पोलिसांनी आखून दिलेल्या वेळेनुसार विसर्जन होईल. केवळ पाच कार्यकर्ते टेम्पोमधून गणेशमूर्ती गिरगाव चौपाटीवर घेऊन जातील,’ असे यांनी सांगितले.

साकीनाका परिसरातील खैराणीच्या राजाच्या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग असतो, तर चेंबूरच्या सह्य़ाद्रीच्या गणपतीला सजवलेले मोठाले रथ, वाजंत्री असतात. परंतु यंदा दोन्हीही गणेशमूर्ती केवळ गणेशाच्या नामघोषात कृत्रिम तलावात विसर्जित होणार आहेत.

पुष्पवृष्टीविना..

पुष्पवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रॉफ बिल्डिंगमधील पुष्पवृष्टी यंदा रद्द करण्यात आली. गेली पन्नास वर्षे ही पुष्पवृष्टी न चुकता होत आली आहे. लालबाग जंक्शन परिसरातून गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होणाऱ्या सुमारे ४०० ते ४५० मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येते. सकाळी ११ पासून रात्री १ ते १.३० वाजेपर्यंत पुष्पवृष्टी सुरू असते. ‘करोनामुळे सर्वच मिरवणुका रद्द करण्यात आल्याने पुष्पवृष्टी न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी मंडळांना भेट देऊन गणपतींना हार आणि श्रीफळ अर्पण करण्यात आले,’ अशी माहिती श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचे सदस्य मनोज माने यांनी दिली.

गुलालाची बाजारपेठ बेरंग

विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्याने गुलालाचीही मागणी घटली. एरव्ही २०० ते ४०० किलो गुलाल सहज विकणारे विक्रेते यंदा किलोभर गुलाल विकण्यासाठीही ग्राहक शोधत आहेत. साधारण मंडळांमध्ये ५० ते १०० किलो तर मोठय़ा मंडळांमध्ये २०० ते ५०० किलोपर्यंत गुलालाची उधळण होते. यंदा शेकडो टन गुलाल विक्रीवाचून पडला आहे. परिणामी गणेशोत्सवात कोटय़वधींची उलाढाल करणारी गुलालाची बाजारपेठ यंदा बेरंग झाली आहे.

विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक, खासगी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी े ३५ हजार पोलीस मनुष्यबळ मंगळवारी तैनात असेल, असे पोलीस प्रवक्त्या एन. अंबिका यांनी सांगितले. भाविकांनी मूर्तीपूजा वआरती घरीच आटोपून घ्यावी. विसर्जनासाठी किं वा विसर्जन सोहळा पाहाण्यासाठी रस्त्यांवर तसेच विसर्जन स्थळांवर गर्दी करू नये. मूर्तीसोबत घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क, अंतर आदी सोवळे पाळावे, असे आवाहनही त्यांनी के ले.

वाद्यांना मागणी नाही

विसर्जनाला ढोल पथक, नाशिक ढोल, बँजो अशा विविध वाजंत्रीना मोठी मागणी असते. परंतु यंदा वाजंत्रीवर बंदी आहे. ‘यंदा मिरवणुका रद्द झाल्या. वादक मंडळींसाठी हा महत्त्वाचा हंगाम असल्याने लाखोंचे नुकसान झाले,’ असे नमन म्युजीकल ग्रुपच्या सिद्धेश पाटील यांनी सांगितले.