मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्या मुंबई परिसरातील नोकरदारांची धावपळ सुरू झाली आहे. रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण संपल्याने आता एसटी आणि खासगी बसशिवाय पर्याय नाही. मात्र खासगी बसच्या प्रवासासाठी प्रत्येकी ४ ते ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
दरवर्षी कोकणात गणपतीसाठी मुंबई महानगर क्षेत्रातून सुमारे १२ ते १३ लाख जण जातात. सुमारे तीन ते साडेतीन हजार खासगी बसेस धावतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसच्या तिकिटात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. हंगामात एसटी तिकिटाच्या दीडपट दरवाढ करण्याची खासगी ट्रॅव्हल्स बसला मंजुरी आहे. मात्र प्रत्यक्षात तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एरवी एक हजारांचे असणारे तिकीट आता ४ ते ५ हजारांच्या घरात पोहोचले आहे.
१ लाख १३ हजार प्रवाशांना रेल्वेची तिकिटे
नोकरदारांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालविण्यात येतात. यंदा मुंबईहून सुटणार्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये १ लाख १३ हजार ४२८ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले असून यातून रेल्वेला ७.७७ कोटी रुपये महसूल मिळाला. मध्य रेल्वे २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबरदरम्यान २०० विशेष आरक्षित आणि ६२ अनारक्षित फेर्या चालवणार आहे. आतापर्यंत आरक्षित रेल्वेमधून १ लाख १० हजार ५२३ प्रवाशांनी नोंदणी केली असून ६.२३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे ७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान ५४ आरक्षित विशेष फेर्या चालवणार आहे. आतापर्यंत २,९०५ प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली आहेत.
एसटीकडून समूह आरक्षण
यंदा एसटी महामंडळाने ५२०० गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६१२ एसटीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यात ३८७ गाड्या ग्रुप बुकिंगच्या आहेत. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी जाणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानुसार ११ आणि १२ सप्टेंबरसाठी सर्वाधिक गाड्यांचे आरक्षण होत आहे.
रेल्वेचे तिकीट आरक्षित झाले नाही तर गैरसोय होईल. त्यामुळे एका राजकीय पक्षाकडून एसटीची माणशी ३०० रुपयांप्रमाणे तिघांची ९०० रुपयांची तीन तिकिटे काढली आहेत. – विठोबा नार्वेकर, प्रवासी, कल्याण सध्या १३० खासगी बस रोज कोकणात जातात. गणेशोत्सव कालावधीत ३५० बस कोकणात जातील. एसटीच्या दीड पट भाडेवाढ करण्याची परवानगी खासगी बसला आहे. त्यानुसार भाडेवाढ असेल. – हर्ष कोटक, अध्यक्ष, मुंबई बस मालक संघटना.
१२ सप्टेंबरचे खासगी प्रवासी बसचे भाडे
मार्ग दर
मुंबई-सिंधुदुर्ग ४ हजार
मुंबई-कुडाळ ३ ते ३५०० हजार
मुंबई-कणकवली ३ ते ४ हजार
मुंबई-सावंतवाडी ४ ते ४५०० हजार
