मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यावर्षी एकूण ३८६ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली. यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई – कोकण मार्गावरील वाढती मागणी लक्षात घेऊन सीएसएमटी – सावंतवाडी रोडदरम्यान अनारक्षित विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्य रेल्वेने ८ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोडदरम्यान नवी दैनंदिन एक्स्प्रेस सुरू केली. त्यानंतर आता १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान सीएसएमटी – सावंतवाडी रोड या मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्या धावणार आहेत. कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या आतापर्यंत २.५० लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले आहे. तर, सुमारे एक लाख अनारक्षित प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१००९ ही अनारक्षित विशेष गाडी १३ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर, परतीची ०१०१० विशेष गाडी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडी रोडहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला येईल. या रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि झारापसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. रेल्वेगाडीची संरचना १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन अशी असून, सामान्य डब्यांचे तिकीट यूटीएस प्रणाली तसेच ‘रेलवन’ ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर भर
गणेशोत्सवात स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये मोठी गर्दी अपेक्षित असल्याने आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित आरपीएफ, रेल्वे पोलीस, स्थानक व्यवस्थापक किंवा १३९ या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, पनवेल आणि दिवा यांसारख्या प्रमुख स्थानकांतून कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांसाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विशेष सुरक्षा व्यवस्था
विशेष रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी जवळपास २५० अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत. नियमित ३,५०० पोलिसांच्या ताफ्याव्यतिरिक्त गणेशोत्सवासाठी अतिरिक्त ४५० गृहरक्षक उपलब्ध झाले आहेत. चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर लालबागचा राजा आणि चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता विशेष गर्दी व्यवस्थापन करण्यात येणार आहे. – एम. राकेश कलासागर, लोहमार्ग पोलीस आयुक्त
कोकणकन्या रेल्वेमध्ये रात्री प्रवासांना चढून न दिल्याचा धक्कादायक प्रकार
गणेशोत्सवासाठी प्रवासी कोकणातील आपल्या मूळगावी निघाले असून रेल्वेच्या सामान्य डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ठाणे स्थानकात पोचल्यानंतर रेल्वेगाडीच्या आतील प्रवासांनी दरवाजा लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी तेथील गृहरक्षकांना याबाबत माहिती दिल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला.
