मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणातील मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून, कोकण मार्गावरून धावणाऱ्या प्रमुख एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे आता जवळपास अशक्य झाले आहे. कोकणात जाणाऱ्या बहुतांश सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण १० सप्टेंबरपासून पुढील सर्व दिवसांसाठी पूर्ण झाले असून, प्रतीक्षा यादी देखील फुल्ल झाल्याने आता थेट ‘रिग्रेट’ (प्रतीक्षा यादीही बंद) असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड होत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, मुंबईस्थित कोकणकरांनी गावची वाट धरली आहे. या पार्श्वभूमीवर १० आणि ११ सप्टेंबर रोजी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना तिकिट मिळू शकलेले नाही.

विस्टाडोमला प्रचंड प्रतिसाद

गाडी क्रमांक १२०५१ जनशताब्दी एक्स्प्रेसचे १० आणि ११ सप्टेंबरचे चेअर कार आणि इतर श्रेणींमध्ये ‘रिग्रेट’ व मोठी प्रतीक्षा यादी दिसत आहे. तसेच विस्टाडोम डब्याची प्रतीक्षा यादी २० च्या पुढे गेली असून तर, १३ सप्टेंबरच्या विस्टाडोम डब्याची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ दाखविण्यात येत होती. त्यामुळे जनशताब्दीच्या विस्टाडोमला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. तर, तेजस एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्याचे १२ सप्टेंबरचे आरक्षण रिग्रेट यादीत आहे.

रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची सद्यस्थिती

– गाडी क्रमांक २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेसचे शयनयान, द्वितीय वातानुकूलित श्रेणी, तृतीय वातानुकूलीत श्रेणीमध्ये १० व ११ सप्टेंबर रोजी थेट ‘रिग्रेट’ स्थिती आहे.

– गाडी क्रमांक ११००३ तुतारी एक्स्प्रेस १० सप्टेंबरसाठी शयनयानमध्ये १०० हून अधिक प्रतीक्षा यादी असून ११ सप्टेंबरसाठी ‘रिग्रेट’ स्थिती आहे.

– गाडी क्रमांक १९०५७ सुरत – मडगाव एक्स्प्रेस व गाडी क्रमांक १२१३३ मंगळुरू एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नसून ‘रिग्रेट’चा संदेश येत आहे.

– गाडी क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेस ११ व १२ सप्टेंबर रोजी ‘रिग्रेट’ दर्शवले जात आहे.

– गाडी क्रमांक १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेसचे शयनयान डब्याचे १० सप्टेंबर रोजीची प्रतीक्षा यादी ३०० पार झाली. तर, ११ सप्टेंबरपासूनची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’मध्ये आहे. तसेच तृतीय श्रेणी डब्यांची प्रतीक्षा यादी १५० च्या पुढे असून उर्वरित इतर डब्यांची

प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’मध्ये आहे.

– गाडी क्रमांक १०१०३ मांडवी एक्स्प्रेसचे सर्व श्रेणीतील डब्यांची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’मध्ये आहे.

विशेष गाड्यांची मागणी

प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्यामुळे रेल्वेने आता थेट तिकीट विक्रीच बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण प्रवाशांकडून केली जात आहे.

नवीन दैनिक रेल्वेगाडीचे आरक्षण दोन मिनिटांत पूर्ण

गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी – सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण काही मिनिटात पूर्ण होऊन, प्रतीक्षा यादी सुरू झाली. तर, ११ सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादी रिग्रेटमध्ये आहे.

वंदे भारतमध्ये प्रवासाची संधी

गाडी क्रमांक २२२२९ वंदे भारत एक्स्प्रेसच्या वातानुकूलित चेअर क्लासचे ११ सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादी १५० च्या पुढे आहे. तर, इकॉनॉमी श्रेणीच्या डब्याची प्रतीक्षा यादी २५ च्या पुढे आहे. परंतु, वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी रिग्रेटमध्ये गेलेली नाही.