मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे हाल यावर्षीही कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावरील नियमित धावणाऱ्या बहुतांश सर्व प्रमुख रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत संपले आहे. गणपतीच्या सुट्टीत मुंबई ते कोकण – गोवा मार्गावरील बहुतांशी सर्व रेल्वेगाड्या आणि त्यामधील शयनयान, वातानुकूलित सर्व डबे ”रिग्रेट” म्हणजेच प्रतीक्षा यादीतही जागा नाही, अशा स्थितीत आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना यावर्षीचा रेल्वेप्रवास रखडणारा ठरणार आहे. मुंबई–कोकण मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या तिकिटांबाबतचा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत प्रतीक्षा यादी भरते आणि लगेचच ”रिग्रेट” असा संदेश दिसू लागतो. विशेष म्हणजे, हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने घडत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत एका वर्गासाठी ठराविक प्रतीक्षा यादीची मर्यादा असते. ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर पुढील आरक्षण स्वीकारले जात नाही आणि ”रिग्रेट” संदेश दिला जातो. मात्र, आरक्षण सुरू होताच काही मिनिटात ही मर्यादा संपते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधीच मिळत नसल्याचा आरोप होत आहे.

तर, यावर्षी १० सप्टेंबर रोजीपासून गणेशोत्सव काळात बहुतांश सर्व रेल्वेगाड्यांचे डबे ”रिग्रेट” स्थितीत आहेत.मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, मंगलाद्वीप, तेजस, योग नगरी ऋषिकेश – तिरुवनंतपुरम उत्तर/कोचुवेली, मांडवी, नेत्रावती, मत्स्यगंधा, लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम कोचुवेली, एलटीटी-एर्नाकुलम दुरंतो, टीव्हीसी राजधानी, मंगळुरू आणि कोकणकन्या या सर्व रेल्वेगाड्या ”रिग्रेट” यादीत आहेत. तसेच, या रेल्वेगाडीला जोडलेले शयनयान डब्यांसह वातानुकूलित सर्व डबे आणि विस्टाडोम डबा देखील ”रिग्रेट” मध्ये आहे.

घोळ नेमका कुठे?

एका रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा तांत्रिक बिघाड नसून एकाच वेळी लाखो वापरकर्ते लॉग-इन करून आरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय तत्काळ आणि सामान्य आरक्षणाच्या वेळेला प्रचंड सर्व्हर लोड येतो. दलाल किंवा वैयक्तिक वापरकर्त्यांकडून एकाच वेळी आरक्षण केले जाते. वेगवान इंटरनेट आणि ऑटो-फिल सुविधेचा वापर, कमी उपलब्ध जागा आणि जास्त मागणी, या कारणांमुळे काही सेकंदांतच उपलब्ध कोटा आणि प्रतीक्षा यादी पूर्ण होते.

प्रवाशांचा संशय

अनेक प्रवाशांच्या मते, आरक्षण सुरू होताच ”रिग्रेट” दिसत असल्याने दलाल किंवा बॉट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर तिकिटे आरक्षित केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो. वर्ष २०२६ मध्ये दलालांविरोधात आतापर्यंत ११० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यासाठी सातत्याने वाणिज्य विभाग व आरपीएफ यांच्या माध्यमातून दलालांवरती लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवाशांना देखील विनंती आहे की, त्यांना कोणीही संशंयास्पद व्यक्ती आढळला, तर त्याची माहिती त्यांनी रेल्वे प्रशासनाला द्यावी. ज्यातून त्यावर योग्य ती कार्यवाही करता येईल.- डॉ. स्वप्नील नीला,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

आयआरसीटीसीने आरक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन संकेतस्थळाचे बीटा व्हर्जन सुरू केले आहे. ज्यामुळे आसन आरक्षित करण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. संकेतस्थळ अद्ययावत केल्यामुळे तिची तिकीट आरक्षण क्षमता वाढली आहे. तसेच तंत्रज्ञान अधिक मजबूत केले आहे. प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी आणि प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कॅप्चा सारख्या अनावश्यक पायऱ्यांचा अडसर हटवण्यात आला आहे. प्रतीक्षा यादी किंवा रिग्रेट येणे हा मागणी आणि पुरवठ्याचा भाग आहे. मर्यादित आसने आणि जास्त प्रवाशांमुळे एकाच वेळी आरक्षण सुरू झाल्यास अवघ्या काही मिनिटांत आरक्षणे पूर्ण होतात. आयआरसीटीसीचे तिकीट आरक्षणासंबंधित सर्व कामकाज रेल्वे मंडळ आणि क्रिस यांच्या समन्वयाने व संमतीने पार पाडले जाते, असे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)चे पश्चिम विभागाचे मुंबईचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.