गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने २,५०० गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर एसटीच्या गाड्या आरक्षित केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी मुंबई, ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी ६५० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी केली असून त्यापैकी ५०० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झालेल्या असतानाच एसटी महामंडळाने अडीच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून करण्यात आले. तर कोकणातून परतीच्या प्रवासासाठी ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात जाणाऱ्या वैयक्तीक आरक्षण आणि गट आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर गट आरक्षण (ग्रुप बुकींग) होत आहे. आतापर्यंत कोकणात जाणाऱ्या २,७५७ गाड्यांना प्रतिसाद मिळाला आहे. यापैकी एक हजार २०१ गाड्यांचे गट आरक्षण झाले असून ८५६ गाड्यांचे वैयक्तीक आरक्षण पूर्ण झाले आहे. तर ७०० एसटीचे आरक्षण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी गट आरक्षण –

यंदा राजकीय पक्षांनीही मोठ्या प्रमाणात एसटी गाड्यांच्या गट आरक्षणाला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाण्यासह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी गट आरक्षण करण्यात येत आहे. शिवसेनेने ठाण्यातून ४०० गाड्यांचे आणि मनसेने १०० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी केल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. तर मुंबईतूनही भाजपच्या लोकप्रतिनिधीनी १५० गाड्यांची मागणी केली आहे. या गाड्यांचे आरक्षणही होत आहे. दक्षिण मुंबईसह शीव, चेंबूर, मुलुंड, वांद्रे, बोरीवली आदी भागातून या गाड्या भाजपमार्फत सोडण्यात येणार आहेत.

१२०० हून अधिक गाड्यांचे गट आरक्षण झाले –

सध्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून एकूण २,७५७ एसटीच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळाला असून यापैकी १२०० हून अधिक गाड्यांचे गट आरक्षण झाले आहे. राजकीय पक्ष, तसेच विविध प्रवासी संघटनांनी मुंबईतून एकूण ६४७ ग्रुप आरक्षण, ठाण्यातून २४९ गाड्यांचे आरक्षण केले आहे.