गेल्या काही दिवसांपासून शहरातील लेडीज बारवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ठाणे पोलिसांनी आता अनैतिक व्यवसाय करणाऱ्या लॉजिंग बोर्डिगकडे मोर्चा वळवला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे नाडलेल्या मुलींना शरीरविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. शुक्रवारी रात्री घोडबंदर रस्त्यावरील ओवळा परिसरात असणाऱ्या श्रेया लॉजिंग बोर्डिगवर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने १२ मुलींची सुटका केली.
ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विभागाला श्रेया लॉजिंग बोर्डिगमध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात मुलींना शरीरविक्रय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या टोळीतील राजेश शेट्टी, अमरिका शहा, राजेश दुबे या त्रिकुटासह गुलाब सिद्दिकी या ग्राहकाला अटक करण्यात आली. मात्र टोळीतील सुजित आणि सतीश शेट्टी हे दोघे फरार आहेत. या मुलींना मानपाडा येथील एका भाडय़ाच्या घरामध्ये ठेवण्यात आले होते. मागणीनुसार त्यांना लॉजवर आणले जाई. त्यातून मिळणाऱ्या पैशातून या सर्वाची उपजिविका चालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.