मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी व गँगस्टर अबू सालेमवर गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल कारागृहात कसे आले, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. हल्लेखोर आरोपी देवेंद्र जगताप उर्फ जेडी परस्परविरोधी जबाब देत असतानाच तुरुंगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीनंतर तुरुंग अधिकारी संजय साबळे यांच्यासह हवालदार चंद्रकांत पाथरे, नितीन सावंत, गीतेश रणदिवे यांना निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी शुक्रवारी कारागृहास भेट दिली. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिलेल्या अहवालात त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेत अनेक त्रुटी असल्याचे म्हटले आहे. कारागृहात जाताना तीन ठिकाणी कैद्याची तपासणी केली जाते. यात पिस्तूल आढळून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे पिस्तूल आपण एक महिन्यापूर्वी आणून कारागृहात ठेवले होते, असे जेडीने पोलिसांना सांगितले आहे. त्यासाठी गटार, स्पीकर यांचा वापर केल्याचे त्याने सांगितले. गुरुवारी जेडीला मुंबईतील न्यायालयात नेण्यात आले होते. तेथून परतताना त्याने फळांच्या बॅगेतून हे पिस्तूल आणले असावे असा पोलिसांचा कयास आहे. याशिवाय नेपाळी गँगच्या दुसऱ्या सदस्याने हे पिस्तूल कारागृहातील शेतात बाहेरून फेकले असावे असाही एक अंदाज आहे.
कैद्यांची गणना करण्याच्या वेळेस सालेम कारागृहातील मोकळ्या जागेत आला असता देवेंद्र जगताप ऊर्फ जेडी याने त्याच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात सालेमच्या उजव्या हाताच्या करंगळीस दुखापत झाली असून त्याच्यावर वाशी येथील पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने तळोजा कारागृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी शुक्रवारी कारागृहास भेट दिली. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिलेल्या अहवालात त्यांनी कारागृहाच्या सुरक्षेत अनेक त्रुटी असल्याचे म्हटले आहे. कारागृहात जाताना तीन ठिकाणी कैद्याची तपासणी केली जाते. यात जेडीकडील पिस्तूल आढळून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर तुरुंग अधीक्षक संजय साबळे यांच्यासह तीन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. हल्ल्यातील आरोपी देवेंद्र जगताप याची चौकशी सुरू आहे. मात्र, कारागृहात पिस्तूल कसे आले, याबाबत तो जबाब बदलत असल्याने पोलीस संभ्रमात आहेत.