मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी व गँगस्टर अबू सालेम याच्यावर गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तळोजा कारागृहात गोळीबार करण्यात आला. देवेंद्र जगताप या कच्च्या कैद्याने केलेल्या या हल्ल्यात गोळी सालेमच्या उजव्या हाताच्या करंगळीला चाटून गेली. सालेमवर वाशी येथील पालिका रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र, कारागृहातच झालेल्या या गोळीबाराने तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सालेमवर याआधी ऑर्थर रोड कारागृहात मुस्तफा डोसा या गँगस्टरने हल्ला केला होता. त्यावेळी सालेमच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर गुरुवारी त्याच्यावर पुन्हा हल्ला झाल्याने नाना तर्काना उधाण आले आहे. गुरुवारी सायंकाळी कैदी मोजण्याच्या वेळी सालेम तळोजा कारागृहातील मोकळ्या जागेत आला असताना नेपाळी गँगचा सदस्य असलेल्या देवेंद्र बाबूराव जगताप याने त्याच्यावर गोळी झाडली. यात सालेमला किरकोळ दुखापत झाली. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला वाशी येथील पालिका रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलिसांनी देवेंद्र जगताप याला ताब्यात घेतले असून मुंबईहून आलेले पोलिसांचे विशेष पथक त्याची चौकशी करत आहे. हा हल्ला अंर्तगत वादातून झाल्याचे कारागृह पोलिसांनी सांगितले. कारागृहाची अंतर्गत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मात्र, कारागृहात पिस्तुल आले कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधीही या कारागृहात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
कारागृहात दुसऱ्यांदा हल्ला
तळोजा कारागृहात हल्ला झालेला कुख्यात डॉन अबू सालेम हा हायप्रोफाईल आरोपी. खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी असे विविध ५० हून अधिक गुन्हे त्याच्या नावावर असले तरी १९९३ च्या मुंबई स्फोटातला तो एक प्रमुख आरोपी आहे. मुंबई स्फोटानंतर तो भारतातून फरार झाला होता. २००५ साली पोर्तुगाल सरकारने गुन्हेगार हस्तांतरण प्रक्रियेनुसार त्याला भारताच्या स्वाधीन केले होते. चित्रपट निर्माते गुलशन कुमार आणि अभिनेत्री मनिषा कोईरालाच्या सचिवाच्या हत्येचाही त्याच्यावर आरोप आहे. २०१० साली आर्थर रोड कारागृहात अबू सलेमवर दाऊदचा हस्तक मुस्तफा डोसा याने चमच्याने हल्ला केला होता. त्यातून बचावलेल्या अबू सलेमला सुरक्षेच्या कारणावरून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात आणण्यात आले होते.
तुरुंगातील यापूर्वीचे प्रमुख हल्ले
२००३ : छोटा राजनचा हस्तक ओ. पी . सिंग याची नाशिक कारागृहात हत्या
२०१२ : इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा सदस्य मोहम्मद कातिल सिद्दीकी याची पुण्याच्या येरवडा कारागृहात हत्या