मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झालेल्या दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी फक्त छोटा राजनने अयशस्वी प्रयत्न केला असे नव्हे तर त्याआधी दाऊदचा काटा काढण्यासाठी दुबईला मस्त्यगंधा ही बोट पाठविण्यात आली होती. या बोटीतून दोन नेमबाज पाठविण्यात आले होते. परंतु दाऊदचा ठावठिकाणा आढळला नाही आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला.

भारतात नऊ वर्षे तुरुगांत राहिलेला गुंड कुमार पिल्ले याला आता हॅांककॅांगला परत पाठविण्यात आले आहे. याच कुमार पिल्लेने दाऊदचा ठावठिकाणा शोधून त्याला मारण्यासाठी आपले खास नेमबाज पाठविले होते. या तपासात गुंतलेल्या गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

मात्र त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. दाऊदला याचा सुगावा लागला. तो कुमारच्या हात धुवून पाठी लागला. अखेरीस कुमारने १९९० च्या सुमारास सिंगापूर व नंतर हॅांगकॅांग येथे पोबारा केला. त्यानंतर त्याने खंडणीसाठी पूर्व उपनगरातील विकासकांना धमकावले. परंतु आपण कधीच तसे केले नाही. आपल्या नावाचा गैरवापर केला, असा दावा कुमार पिल्लेने तपास यंत्रणांकडे केला आहे. आता आपल्याला चांगले आयुष्य जगायचे आहे, असेही त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते. त्यामुळेच भारताऐवजी हॅांगकॅांगला जाणे पसंत केले आहे. त्याने हॅांगकॅांगचे नागरिकत्व मिळवले आहे. त्याच्यावर असलेल्या तीन गुन्ह्यांप्रकरणी भारतात खटले चालविण्याची परवानगी होती. त्यामुळे आता त्यांच्यावरील अन्य गुन्ह्यांसाठी तपास यंत्रणांना पुन्हा नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे.

कुमारचे वडील कृष्णा पिल्ले हे विक्रोळी पूर्व येथील हरियाली व्हिलेज (टागोर नगर) येथे क्लब चालवित होते. तेथील गरीब मुलांसाठी त्यांनी शाळाही सुरु केली होती. ही शाळा कुमारची आई चालवते. या परिसरात या कुटुंबीयांना मान होता. कुमारही टेक्स्टाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास करीत होता. परंतु वडिलांची दाऊद टोळीकडून हत्या झाल्यानंतर तो सुडाने पेटून उठला. त्यातूनच लालसिंग चौहान व झुणझुणवाला महाविद्यालयातील प्रा. अरुण सिंग या हत्यांनी तेव्हा मुंबई हादरली होती. या हत्या कुमार पिल्लेने घडवून आणल्या होत्या. त्यातूनच त्याची दहशत पसरली.

एकेकाळी मुंबईत सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंची जोरदार तस्करी व्हायची तेव्हा दाऊद शहरात तर पूर्व उपनगरात ही आघाडी कृष्णा पिल्ले सांभाळायचा. त्यातून तो दाऊद टोळीच्या संपर्कात आला. परंतु अमली पदार्थ तस्करीत भरपूर पैसा असल्यामुळे दाऊदने या तस्करीचा आग्रह धरला. परंतु त्यास कृष्णा पिल्ले याने नकार दिला. त्यातच क्लबची मालमत्ता स्थानिक राजकारण्याला हवी होती. ती विकण्यास नकार दिल्याचेही एक कारण होते. त्यातून कृष्णा पिल्ले याची हत्या झाली.

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेऊन कुमारने टेक्सटाईल अभियांत्रिकीचे करिअर सोडून दिले. दाऊदचा हस्तक लालसिंग चौहान याने कृष्णा याची हत्या केली होती. कुमार पिल्लेने लालसिंग चौहानचा बोरिवली येथे काटा काढला. त्यानंतर वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदला मारण्याची योजना आखली होती. त्यासाठी थेट दुबईला मस्त्यगंधा बोटीतून गुंड पाठवले होते. प्रा. अरुण सिंग यांची अमर नाईकच्या गुंडांनी हत्या केली असली तरी ही हत्याही कुमार पिल्लेच्या सांगणावरुनच घडविण्यात आली होती, असा तपास यंत्रणांचा दावा आहे.

कुमार हा अश्विन नाईकचा मित्र. त्यातून तो अमर नाईकशीही संपर्कात आला. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी सात-आठ गुन्ह्यांत कुमार पिल्लेचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यातच १९९० मध्ये तो फरार झाला. फरार झाल्यानंतर, त्याने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय केला. याच जोरावर त्याने हॅांगकॅांगचे नागरिकत्व मिळवले. २०१६ मध्ये त्याला सिंगापूरमध्ये ताब्यात घेण्यात आले. खंडणी व हत्येच्या प्रयत्नाच्या तीन गुन्ह्यांप्रकरणी कुमार पिल्लेला भारताच्या हवाली करण्यात आले. तेव्हापासून तो तुरुंगात होता. मात्र या तिन्ही प्रकरणांतून निर्दोष सुटल्यानंतर, मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याला हाँगकाँगला परत पाठवण्याचा आदेश दिला.

मुंबई पोलिसांनी २००७ मधील एका प्रलंबित खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये ते वॉरंट रद्द केले. प्रत्यार्पण न झालेल्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर खटला चालवणे हे भारतीय प्रत्यार्पण कायद्याच्या कलम २१ चे उल्लंघन आहे, असा निकाल न्यायालयाने दिला. त्यामुळे अखेर त्याला हॅांगकॅांग येथे पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. भारतात राहिलो तर गुन्हे दाखल होतील या भीतीनेच गेल्या आठवड्यात गुरुवारी तो हॅांगकॅांगला परतला.

पुढील तीन प्रकरणांत कुमार पिल्ले निर्दोष

  • २०१३ खंडणी प्रकरण (विक्रोळी): विकासकाकडून ७५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. डिसेंबर २०२० मध्ये विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.
  • २००९ खंडणी आणि गोळीबार (विक्रोळी): विकासकाला धमकावण्याचा आणि गोळीबार करण्याचा कट रचल्याचा आरोप. एप्रिल २०२२ मध्ये निर्दोष मुक्तता.
  • २००९ कांजूरमार्ग गोळीबार : पैसे उकळण्याच्या प्रयत्नात विकासकाच्या कार्यालयावर गोळीबार केल्याचा आरोप. मकोका न्यायालयाकडून मार्च २०२४ मध्ये निर्दोष मुक्तता.