पोलिसांना अनेक गुन्ह्य़ात हवा असलेला गुन्हेगार पकडण्यासाठी आंबिवलीजवळील इराणी वस्तीत गेलेल्या ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांना इराणी वस्तीमधील महिला व पुरुषांनी बेदम मारहाण केली. या गदारोळात वस्तीमध्ये लपून बसलेला अमजद इराणी हा गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी २३ हल्लेखोरांविरुद्ध महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या सहा वर्षांपूर्वी गुन्हेगारांना पकडण्यासाठी इराणी वस्तीत गेलेल्या कल्याणमधील पोलिसांवर अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. सोनसाखळी चोर, काही खतरनाक गुंड यांचे निवासस्थान म्हणून इराणी वस्ती ओळखली जाते. या वस्तीत पोलीस गेले की प्रथम महिला मोठय़ा प्रमाणात घराबाहेर प्रतिकार करण्यासाठी पडतात, असे पोलिसांनी सांगितले.
कापूरबावडी परिसरात धुमाकूळ घालणारा अमजद गुन्हेगार इराणी वस्तीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, पुरुषांचे पथक शनिवारी त्यांच्या शोधासाठी तिथे आले होते. इराणी वस्तीचा अनुभव नसल्याने कापूरबावडी पोलिसांवर महिलांनी हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. या झटापटीत अमजद पळून गेला.
महात्मा फुले पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. निरीक्षक एन. जी. खडकीकर यांनी असा हल्ला झाल्याचे सांगून अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगितले.