सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीर, ओदिशातील वितरकांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने शहरातील नशेच्या पदार्थ विक्रेत्यांची साखळी उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या दोन वर्षांत विविध कारणांमुळे मुंबईत चरसची तस्करी सुरू होती. त्यावर सुरक्षा यंत्रणांनी घाला घातल्याने गांजाच्या तस्करीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

चरस आणि गांजाची तस्करीची समस्या गंभीर बनली होती. स्वस्त असल्याने श्रमिक वर्ग गांजाचा ग्राहक आहे. शहरातील एका मोठय़ा वर्गाची चरसला नेहमीच मोठी मागणी होती.

चरस पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेतला जाणारा अमली पदार्थ आहे. तर काश्मीर खोऱ्यात गांजा पिकवला जातो. ओदिशातील नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातही गांजाचे पीक घेतले जाते. काश्मीर आणि ओदिशात मुंबईतील अमली पदार्थ विक्रीमुळे पैशाचा ओघ आहे. नेमक्या या अर्थव्यवस्थेला मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने खिळखिळी करण्यासाठी योजना आखली. किरकोळ विक्रेत्यांऐवजी मोठे वितरक, पुरवठादार, वाहक यांना लक्ष्य करून ही साखळी उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या कारवायांमध्ये काश्मिरातील चरस निर्माते आणि वितरण साखळीतील तरुणांनाही अटक झाली. त्यांच्या चौकशीतून पुढे आलेले तपशील पथकाने केंद्र सरकारला धाडले. त्यात आर्थिक स्रोत, त्याचा संभाव्य विनियोग, संघटित साखळी आदी तपशील होते. त्यानंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) आक्रमक बनली.

गेल्या दोन वर्षांत एनसीबीने गुजरातच्या अहमदाबाद आणि अन्य राज्यांत चरस वितरकांवर कारवाया केल्या.

या कारवायांमुळे एकाच खेपेत शे-दोनशे किलो चरसचा साठा शहरात येण्याऐवजी एक ते दोन किलो येऊ लागला. परिणामी, चरसची आवक घटल्याने भाव वधारला. त्याचा फटका वितरण साखळीला आणि नशेबाज ग्राहकांना बसला.

आता काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

काश्मीरसोबत अन्य राज्यांमध्येही कडेकोट बंदोबस्त, झाडाझडती सुरू आहे. त्यामुळे चरसचा बेताने होणारा पुरवठाही विस्कळीत झाला. तुटवडय़ामुळे शहरात चरसचा भाव आणखी वधारल्याने नशेबाज आणि विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. याच परिस्थितीत शहरात गांजाची आवक वाढू शकेल, अशी शक्यता अमली पदार्थविरोधी यंत्रणांकडून व्यक्त होते. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सायन येथून ३० किलो गांजा पकडला.

‘मनाली क्रीम’ची भुरळ

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत काश्मीर खोरे, हिमाचल प्रदेशातील पर्वतराजींमध्ये चरसची निर्मिती होते. चरस साठवून ते मागणीप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये पाठवले जाते. पूर्वी मालवाहू वाहने, प्रवासी कारमध्ये चोरकप्पे बनवून मोठय़ा प्रमाणात चरस थेट मुंबईत येत होता. मात्र मधल्या काळात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवायांमुळे चरस थेट येण्याऐवजी राजस्थान, गुजरात अशी मजल दरमजल करत मुंबईत आणला जातो. हिमाचल प्रदेशातील चरसची (मनाली क्रीम) जगभरातील नशेबाजांना भुरळ आहे. त्यापाठोपाठ काश्मीरमधील चरसला मागणी आहे.